मुंडेंच्या रिक्त जागेवर शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींच्या नावाची चर्चा...

मुंडेंच्या रिक्त जागेवर शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरींच्या नावाची चर्चा...

पुणे: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना की स्टार कँपेनर अमोल मिटकरी यांना संधी देणार, याविषयी उत्सुकता आहे.

विधान परिषद सदस्य असलेले धनंजय मुंडे व तानाजी सावंत यावेळेस विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी कायद्यानुसार विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या जागांची पोटनिवडणूक शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. तानाजी सावंत यांनी प्रतिनिधित्व केलेल्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाची निवडणूक 31 जानेवारीला होणार आहे. धनंजय मुंडे हे विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर निवडून गेले होते. त्यांच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक 24 जानेवारीला होत आहे.

विधानसभेत महाविकास आघाडीला बहुमत आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या जागेवर होणारी पोटनिवडणूक आघाडीला जिंकण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. दुसरी बाब म्हणजे ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाला जागा सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, याविषयी उत्सुकता असणार आहे.

पक्षप्रमुख शरद पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांची भुमिका यासंबंधाने महत्वाची असणार आहे. निवडणूक निकालानंतर मुंबईतील सत्कार कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पराभूत उमेदवारांनी विधान परिषदेची अपेक्षा धरू नये, असे स्पष्टपणे बजावले आहे. त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात पहिली विधान परिषदेची आमदारकी अमोल मिटकरी यांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. पण यानावाच्या संदर्भात शरद पवार काय भुमिका घेतात, हेही महत्वाचे आहे.

विधानसभेच्या पराभूत उमेदवारांनी विधान परिषदेची अपेक्षा धरू नये असे अजित पवार यांनी म्हटले असलेतरी शशिकांत शिंदे यांच्याबाबतीत अपवाद केला जावू शकतो. शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात अल्पश: मतांनी पराभूत झाले आहेत. मात्र   पक्षाच्या विजयासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. पक्षासाठी शशिकांत शिंदे इतके महत्वाचे आहेत की, शिंदे पराभूत झाल्याचे समजताच शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या विजयाप्रित्यर्थ नियोजित केलेला सातारा दौरा रद्द केला. सत्तास्थापनेच्या घडामोडींत हेच शिंदे परागंदा आमदारांना शोधण्यात आघाडीवर होते. त्यांच्यावर पवारांचा विश्वास असल्याने त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष हे विधीमंडळात असावेत म्हणून त्यांना परिषदेवरही घेतले जाणार आहे. पण प्रदेशाध्यक्षपदी कधी नेमणूक होणार आणि विधान परिषदेवर कधी घेतले जाणार, हे अजून अस्पष्ट आहे. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com