उत्सुकता अन्‌ धडधड

उत्सुकता अन्‌ धडधड

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच निकालाच्या चर्चेला रंग चढला आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे मावळच्या निवडणुकीत उतरविल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे या निवडणुकीवर बारीक लक्ष होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा केला जात असून त्याची गणिते मांडली जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हेही रिंगणात होते. त्यामुळे त्यांचा मतांचा सर्वाधिक फटका युती आणि आघाडीमध्ये कुणाला बसणार यावर चर्चा झडत आहेत. 

युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील मतभेद मतदानापूर्वी झालेल्या मनोमिलनातून दूर झाले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे निवडणुकीत युतीचे कार्यकर्ते प्रचारात दिसले होते.

बूथ पातळीवर केलेल्या कामामुळे युतीच्या कार्यकर्त्यांना बारणे जिंकतील असा विश्‍वास वाटत आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी युतीच्या उमेदवारालाच मतदान केल्याचे ही मंडळी उत्स्फूर्तपणे सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पहिल्यांदा निवडणूक लढवत असले तरी ते सर्वांत तरुण उमेदवार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव अशी त्यांची ओळख असल्यामुळे ते नक्‍कीच निवडून येतील, असा विश्‍वास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे. पार्थ यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. 

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील राजकीय परिस्थिती वेगळी होती. आता त्यामध्ये बदल झाला आहे. शेतकरी कामगार पक्ष पार्थ पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच खासदार राहिलेल्या बारणे यांनी या भागाचा काहीच विकास केलेला नाही, त्यामुळे येथील मतदारांना बदल हवा आहे, त्यामुळे पार्थ निवडणूक सहजपणे जिंकतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघ
 ग्रामीण भागात राष्ट्रवादी-शेकाप, तर शहरी भागात सेना-भाजपचे वर्चस्व.
 कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार.
 तालुक्‍यातील कळंब व पाथरज या दोन गटांत शेकापची ताकद, तर उमरोली, नेरळ, सावेळे या गटात शिवसेनेची ताकद आहे. बीड गटात राष्ट्रवादीची ताकद आहे. नेरळ जिल्हा परिषद गटात शिवसेना आणि काँग्रेस सोबत होती; तर उमरोली गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यांनी माघार घेतली होती.
 खालापूर तालुक्‍यात राष्ट्रवादीकडे असलेले दोन्ही जिल्हा परिषद गट शिवसेनेला पक्षांतर्गत बंडाळीमुळे गमवावे लागले आहेत. तीच अवस्था खालापूर नगरपंचायतीमध्ये झाली आहे.
 कर्जत पंचायत समितीमध्ये शिवसेना बहुमतात. बारापैकी सात सदस्य शिवसेनेचे.
 कर्जतचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे. भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ दहा, तर राष्ट्रवादीचे आठ सदस्य आहेत. 
 माथेरानचे नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असून, त्याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यांचे संख्याबळ 
१३ असून, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे संख्याबळ चार आहे. भाजपला स्थान नाही. 
 खालापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीचे वर्चस्व आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद शेकापकडे असून, त्यांचे नऊ सदस्य आहेत. त्या खालोखाल शिवसेनेचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य आहेत. 
 खोपोलीचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. राष्ट्रवादी आणि 
शिवसेनेचे संख्याबळ समसमान आहे. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे वर्चस्व नाही.

मावळ विधानसभा मतदारसंघ
 गेल्या पाच वर्षांत विविध महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. मात्र, सहकार क्षेत्रातील विविध पदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत.
 मावळमध्ये आमदारसह पंचायत समितीचे सभापती व उपसभापतिपद भाजपकडे. पंचायत समितीचे दहापैकी सहा सदस्य भाजपचे, तर चार राष्ट्रवादीचे.
 पुणे जिल्हा परिषदेच्या पाचपैकी एका सहयोगी सदस्यासह तीन सदस्य राष्ट्रवादीचे तर दोन भाजपचे.
 तळेगाव दाभाडे व लोणावळा नगर परिषद तसेच देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड यावर भाजपची सत्ता. 
 संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भाजपचे चार संचालक.
 जिल्हा बॅंक व जिल्हा दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा संचालक. गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायट्या व दूध सोसायट्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व.
 तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद सध्या भाजपकडे, तर खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

उरण विधानसभा मतदारसंघ
 मतदार संघामधील पनवेल तालुक्‍यातील चार जिल्हा परिषद शेकापच्या ताब्यात. 
 उरण तालुक्‍यामधील दोन जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहेत, तर प्रत्येकी एक सदस्य शिवसेनेचा आणि भाजपचा आहे.
 खालापूरमधील दोन पैकी एक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा, तर एक राष्ट्रवादीचा आहे.
 उरण नगरपालिकामध्ये भाजपची सत्ता असून, नगराध्यक्षासह चौदा नगरसेवक त्यांचे आहेत. चार नगरसेवक शिवसेनेचे.
 तालुक्‍यात भाजपची ताकत नसतानाही नगरपालिकेवर; मात्र अनेक वर्षे भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
 या मतदारसंघात काँग्रेस शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्रित करून आघाडीची ताकद शिवसेना आणि भाजपपेक्षा निश्‍चित जास्त आहे.

पिंपरी, चिंचवड विधानसभा
 २०१७ मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपासून शहरावर भाजपची एकहाती सत्ता. १२८ पैकी भाजपकडे ७७, तर शिवसेनेकडे नऊ नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, अपक्ष पाच व मनसे एक असे बलाबल आहे.  
 महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी मावळमधील युतीचे उमेवार बारणे यांना निवडणुकीत त्याचा किती फायदा झाला, हे निकालानंतरच समोर येणार आहे. 

पनवेल विधानसभा मतदारसंघ
 तालुक्‍यातील राजकारणात गेली पाच वर्षे भाजपचे एक हाती वर्चस्व. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल ५३ नगरसेवक.  
 तालुक्‍यातील भाजप पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. विरोधातील शेकापच्या नगरसेवकांच्या संख्येत मात्र घट. 
 शेकाप महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या साथीने आघाडीकडून लढला होता.
 महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन सदस्य, काँग्रेस पक्षाकडून दोन सदस्य निवडून आले आहेत. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची पाटी मात्र महापालिकेच्या सभागृहात कोरी आहे.
 तालुक्‍यातील उर्वरित भागात दोन जिल्हा परिषद सदस्य उरले आहेत. एका सदस्यपदी शेकापक्षाचा उमेदवार निवडून आला असून, एका ठिकाणी भाजपला सदस्यपद मिळविण्यात यश आले आहे.
 उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती मिळून तयार झालेल्या पनवेल पंचायत समितीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Result Shivsena NCP Shrirang barne and Parth Pawar Politics

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com