मुंबईत तीन आमदारांच्या साहित्याची चोरी

मुंबईत तीन आमदारांच्या साहित्याची चोरी

बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी मुंबई येथे जात असताना कल्याण नजीक आमदारांच्या राखीव बोगीतून त्यांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 

मतदार संघातील विविध प्रश्‍न आणि समस्या मांडण्यासाठी आमदार हे विधानसभेच्या अधिवेशनाला हजेरी लावत असतात. परंतु, तेथेच न राहता काही महत्त्वपूर्ण निर्णय आणि कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी आमदार हे सहा दिवस अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर शनिवार व रविवार सुट्टी असल्यामुळे पुन्हा मतदार संघात परत येत असतात. यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने आमदारांच्या ये-जा करण्यासाठी स्वतंत्र बोगीची व्यवस्था करण्यात येत असते. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसचे चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे, मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच सिंदखेडराजा मतदार संघातील शिवसेना आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे त्यांच्या कार्यक्षेत्रात परतले होते. दरम्यान, दोन दिवसांची सुट्टी झाल्यानंतर पुन्हा ते सोमवारी विधानसभा अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघाले होते.

दरम्यान, आमदार राहुल बोंद्रे हे विदर्भ एक्स्प्रेसने मलकापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाण्यासाठी त्यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे यांच्यासोबत निघाले होते. याच दरम्यान, कल्याण स्टेशनवर सकाळी 6 वाजेदरम्यान, वृषाली बोंद्रे झोपलेल्या असताना आरक्षित बोगीत चोरट्याने प्रवेश करत त्यांच्या उशीला ठेवलेली पर्स खेचून पळविली. यावेळी आमदार बोंद्रे यांनी चोरट्याचा पाठलागही गेला. त्याला पकडलेही परंतु तो हिसका देऊन प्लॅटफॉर्मवरुन खाली उतरून पळून जाण्यास यशस्वी झाला. असाच काहीसा प्रकार आमदार डॉ. संजय रायमूलकर व डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासोबतही घडला. जालना येथून रविवारी मुंबईकडे देवगिरी एक्स्प्रेसने निघाले असा त्यांच्याही साहित्यावर चोरट्यांनी हात साफ करत बॅग, मोबाईल, विधानसभा ओळखपत्र चोरीला गेले आहे. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या महत्त्वपूर्ण कागदपत्र असलेल्या त्यांच्या स्वीय साहाय्य यांची बॅग चोरीला गेली आहे. यासंदर्भात तिन्ही आमदारांनी एकत्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार केली आहे. 

आरक्षित बोगीतून आमदारांचे साहित्य चोरीला जाणे ही बाब निंदनीय असून, राज्यात आता चोरट्यांना अच्छे दिन आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्टेशनवर सीसीटीव्ही, गार्ड आणि पोलिस असताना चोर्‍यांची हिंमत कशी होत असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत रीतसर तक्रार करण्यात आली आहे. तत्काळ कारवाई होऊन चोरट्यांचा शोध लागणे गरजेचे आहे. 
- आमदार राहुल बोंद्रे, चिखली. 

चोरट्यांचा तपास घेणे सुरू
कल्याण स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरट्यांचा तपास करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असून, लवकरच रेल्वे सुरक्षा दल चोरट्यांना अटक करतील असे मुख्य जनसंपर्क कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथील कार्यालयातून सांगण्यात आले आहे. 

Web Title: luggage of three maharashtra MLAs stolen in Mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com