लवकरच महाशिवआघाडीचा शपथविधी

लवकरच महाशिवआघाडीचा शपथविधी

मुंबई : गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा   शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. 

तसेच एवढंच नाही शुक्रवारी होणाऱ्या बैठकीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बोलवण्यात आलं आहे. तसंच पाच सहा दिवस राहण्याच्या तयारीने या असाही निरोप मातोश्रीवरुन आला आहे असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं सरकार लवकरच महाराष्ट्रात स्थापन होईल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं आपल्याला वाटत असल्याचंही ते म्हणाले. आम्ही भाजपाकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं. मात्र भाजपाने आम्हाला ते नाकारलं. त्यामुळे हा सगळा पेच निर्माण झाला. आता शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेच हे संकेत आहेत असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं.

लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेलं सरकार येईल आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असाही विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. राज्यात शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचमुळे महाराष्ट्रात २५ तारखेच्या आसपास जेव्हा सरकार स्थापन केलं जाईल आणि त्यानंतर कॅबिनेटची जी बैठक बोलवली जाईल त्या बैठकीत शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल असाही विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

२१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यानंतर २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात महायुतीला कौल मिळाला खरा मात्र शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला आहे ही मागणी लावून धरली. तर असं काहीही ठरलं नव्हतं म्हणत भाजपाने ही मागणी नाकारली. अखेर या दोन्ही पक्षांचा काडीमोड झाला आणि महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येईल अशी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आहे तरीही ही चर्चा कायम आहे. कारण बंद दाराआड शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची खलबतं सुरु आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे. "महाराष्ट्राची जनता, शेतकरी सरकारची वाट पाहत आहे. पक्षाचे कार्यकर्त्यांनाही लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावी अशी इच्छा आहे. पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. अडीच वर्ष मागितलं होतं, पण आम्हाला हक्काचं पद मिळालं नाही. शेतकऱ्यांच्या विषयाकडे तिन्ही पक्ष गांभीर्याने पाहू लागले. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना न्याय देता येईल, असेही सत्तार म्हणाले.

Web Title: shivsena congress and ncp will form the government in maharashtra till 25th november says abdul sattar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com