राज ठाकरेंच्या हाती आता भगवा? मनसे आता वेगळ्या रंगात दिसणार...

राज ठाकरेंच्या हाती आता भगवा? मनसे आता वेगळ्या रंगात दिसणार...

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत घरोबा केल्याने त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे. यासाठी प्रसंगी मनसे आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलणार असल्याची चर्चा आहे. येत्या 23 जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे याबाबतची घोषणा करणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

नवमहाराष्ट्राची निर्मिती आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. सुरुवातीला टोलमाफी, मराठी पाट्या आणि रेल्वे भरतीमध्ये मराठी माणसाला प्राधान्य या मुद्द्यावर मनसेने केलेल्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 2009 मध्ये झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. यानंतर मात्र मनसेचे मराठी कार्ड फार चालले नाही. 

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केवळ एक आमदार निवडून आणताना फारच दमछाक झाली. त्यामुळेच आता राज ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेऊन राज ठाकरे आपली पुढील राजकीय खेळी खेळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठी मनसेच्या झेंड्यांचा रंगही बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मनसेचे पहिले महाधिवेशन 23 जानेवारीला गोरेगावमध्ये होणार आहे. या महाअधिवेशनात राज ठाकरे आपली नवी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेल्या मनसेच्या झेंड्याचा रंगही बदलण्यात येणार असून मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असेल, अशी माहिती मिळत आहे. सुरुवातीला मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, हिरवा आणि निळ्या रंगाचा वापर करत हिंदू, मुस्लिम आणि दलितांना आपल्याकडे खेचण्याची रणनीती आखली होती; मात्र निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळत नसल्याने आपली भूमिका बदलण्याची शक्‍यता आहे.

23 जानेवारीला गोरेगावमध्ये होत असलेले महाअधिवेशन पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरेंच्या नेतृत्वात बैठका सुरू आहेत. पक्षाच्या महाअधिवेशनात मनसेची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट होईल. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः भूमिका स्पष्ट करतील. - अनिल शिदोरे, नेते, मनसे.

Web Ttile - MNS may change flag colour

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com