यंदा लोकसभेत ८ महिला खासदार

यंदा लोकसभेत ८ महिला खासदार

भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर
मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे. 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सहा महिला खासदार निवडून गेल्या होत्या, त्यात या वेळी दोन महिला खासदारांची भर पडली आहे. १७व्या लोकसभेवर राज्यातून निवडून गेलेल्या आठही महिला खासदार घराणेशाहीतूनच राजकारणात आलेल्या आहेत हे विशेष! 

लोकसभेत यंदा महाराष्ट्रातून दोन नवीन महिला खासदार गेल्या आहेत. त्यामध्ये भाजपच्या दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या या दोघींनीही २०१४ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र, त्या वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भारती पवार यांनी यापूर्वीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती, या वेळी त्यांना पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकिटावर भारती पवार निवडूनदेखील आल्या. भारती पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नूषा आहेत.  

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत अपक्ष खासदार नवनीत राणा या ‘जायंट किलर’ ठरल्या आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही राणा यांनी मतदारांशी जनसंपर्क कायम ठेवला होता. त्यांचे पतीही रवी राणा हे विधानसभेत आमदार असून, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. 

उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव भाजपच्या पूनम महाजन यांनी केला आहे. महाजन या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून जाणार आहेत. भाजप युवा मोर्चाच्या महाजन राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांच्या पश्‍चात त्यांचा राजकीय वारसा महाजन यांच्याकडे आला आहे. 

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडल्या गेल्या आहेत. रावेर मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे निवडून आल्या आहेत. दुसऱ्यांदा लोकसभेवर निवड झालेल्या रक्षा खडसे या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा आहेत. नंदुरबारमधून डॉ. हीना गावित दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हीना या माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या आहेत.

गवळींची पाचवी, सुळेंची तिसरी ‘टर्म’
यवतमाळ - वाशीम मतदारसंघातून भावना गवळी पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. बारामतीमधून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर सुप्रिया सुळे निवडून गेल्या आहेत. मागच्या निवडणुकीत सुळे ७० हजार मतांनी निवडून आल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी खडतर मानली जात होती. मात्र, मागच्या पाच वर्षांत सुळे यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवल्याने या निवडणुकीत त्यांना दीड लाखापेक्षा अधिक मतांचे मताधिक्‍य मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या असल्याने सुळे यांना राजकारणात सहज प्रवेश मिळाला असला तरी, त्यानंतर टिकून राहण्यासाठीची स्वतंत्र लढाई लढावी लागण्याचे सुळे यांना वाटते.

Web Title: Election Results Women in Parliament Politics

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com