अजित पवारच उपमुख्यमंत्री...अखेर ठरलं?

अजित पवारच उपमुख्यमंत्री...अखेर ठरलं?
Ajit Pawar, NCP, Maharashtra

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या (ता. 30) पार पडणार आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली असताना, उपमुख्यमंत्रिपदाविषयीचा सस्पेन्स कायम आहे. मुंबईत आज, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून कळते. 

काय घडले सिव्हर ओकवर
मंत्रिमंडळ विस्तारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्रिपदासाठी पक्षाचे अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री केले जावे, अशी मागणी खुद्द जयंत पाटील, वळसे-पाटील आणि भुजबळ यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अजित पवार हे उद्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. त्यांच्याकडे "ग्राम विकास' किंवा "अर्थ' खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गृहमंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता महाराष्ट्राला उत्सुकता आहे. पण, हे खाते कोणाला मिळणार हे विस्तारानंतरच स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. नव्या मंत्रिमंडळात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रादेशिक तसेच सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

कोणत्या पक्षाचे किती मंत्री?
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यात 10 कॅबिनेट आणि तीन राज्य मंत्र्यांचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये 10 कॅबिनेट तर, 3 राज्यमंत्री शपथ घेतील. कॉंग्रेसचे 12 मंत्री शपथ घेतील. त्यात 10 कॅबिनेट, 2 राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.

Web Title:  Ajit Pawar Will Next Maharashtra Deputy CM

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com