नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात

नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात

मुंबई - बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावांतील जमीन संपादन करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास विरोध केला होता. त्यामुळे या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया नियोजित ठिकाणची थांबविण्यात आली. मात्र, प्रस्तावित नाणार महातेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात रोजगाराच्या संधी आणि विकासाच्या दृष्टीने होणे गरजेचे होते.

त्यामुळे प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन नाणार ठिकाणाऐवजी तो कोकणात अन्य ठिकाणी हलविण्यात आला. त्यातून रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या तालुक्‍यांतील ४० गावांतील जमीन सिडकोने एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहित यापूर्वीच केली. हीच जमीन नाणार प्रकल्पासाठी देण्याचे निश्‍चित करण्यात आले असून, त्यादृष्टीने अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कागदपत्रे मागविण्यात आली.

Web Title: Nanar Project in Raigad District

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com