लवकरच मुंबई ते शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात

 लवकरच मुंबई ते शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासात

मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणारी नव्या स्वरुपाची ट्रेन १८ ही गाडी मुंबई ते शिर्डी या मार्गावर चालविण्यात येणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते शिर्डी हे २९१ किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन तासांत पूर्ण केले जाणार आहे. सध्या हे अंतर रेल्वेच्या साह्याने कापण्यासाठी सुमारे नऊ तास लागतात. शिर्डीतील साईबाबांचे मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेकजण नित्यनेमाने शिर्डीला जात असतात. यासाठी मुंबईहून शिर्डी मार्गावर ही गाडी चालविण्यात येईल. 

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नव्या स्वरुपातील ट्रेन १८ साठी मुंबई ते शिर्डी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या ट्रेनच्या प्रवासाबद्दल चर्चा झाली. मुंबईतून सकाळी हे गाडी शिर्डीसाठी रवाना होईल. तीन तासांत शिर्डीला पोहोचल्यावर ती त्याच दिवशी संध्याकाळी शिर्डीहून मुंबईसाठी रवाना होईल. सध्या मुंबईहून शिर्डीला रेल्वेने जाण्यासाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे प्रवासी या मार्गाने प्रवास करणे टाळतात. पण जर ट्रेन १८ मुळे तीन तांसात शिर्डीला जाणे शक्य होणार असेल, तर अनेक प्रवासी या मार्गाने शिर्डीला जाणे पसंद करतील, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेकडून ट्रेन १८ ही गाडी मुंबई ते दिल्ली या मार्गावर चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात रेल्वे मंत्रालयाने सर्व विभागीय प्रमुखांची बैठक नवी दिल्लीत घेतली. त्यावेळी ट्रेन १८ कोणत्या मार्गावर चालवायची, यावर चर्चा करण्यात आली.

Web Title:  Mumbai to Shirdi in 3 hours Train 18 may put your ride on fast track

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com