खुल्या पिंजऱ्यात शिरून बिबट्याने वन्य प्राण्यांवर केला हल्ला

खुल्या पिंजऱ्यात शिरून बिबट्याने वन्य प्राण्यांवर केला हल्ला

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालातील वन्यप्राणी बचाव केंद्रातील खुल्या पिंजऱ्यात शिरून बिबट्याने नऊ वन्यप्राण्यांना ठार मारले. बचाव केंद्रातील डीअर १ जवळील सोलर फेन्सिंग लावलेल्या पिंजऱ्याच्या परिसरात रात्रीच्या सुमारास बिबट शिरला. त्यात पाच चितळ, तीन  काळवीट आणि एका चौशिंग्यावर हल्ला करून ठार मारले. ही घटना आज सकाळी वनकर्मचारी वन्यप्राण्यांना खाद्यान्न टाकण्यासाठी गेले असता उघडकीस आली. 

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचा परिसर १९१४ हेक्‍टर परिसरात विस्तारलेला आहे. यातील उत्तर भागातील एक हजार हेक्‍टर सफारीसाठी खुले आहे. लगतच्या ८९ हेक्‍टर परिसरात गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र आहे. या परिसरात अनेक बिबट्यांचा वावर आहे. त्यापैकी एका बिबट्याने बचाव केंद्रातील परिसरातील डीअर १ पिंजऱ्यात रात्रीच्या वेळी शिरकाव केला आणि बचाव केंद्रातील ९ वन्यप्राण्यांवर हल्ला करून ठार मारले. यामुळे बचाव केंद्रातील या तिन्ही प्रजाती नष्ट झाल्या आहेत. हे नऊही वन्यप्राणी अनाथ असल्याने त्यांना येथे आणले होते. महत्त्वाचे म्हणजे या पिंजऱ्याला सोलर फेन्सिंग केले होते. ते सुमारे १२ फुटांपेक्षा उंच आहे.  असे असताना बिबट्या या पिंजऱ्यात कसा शिरला हा प्रश्‍न गोरेवाडा बचाव केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडला आहे. 

दोन वर्षांनंतर पुनरावृत्ती
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात २०१६ मध्ये बिबट्याने पिंजऱ्यातील तीन काळविटांवर हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून सोलर फेन्सिंग लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सर्वच पिंजऱ्यांना सोलर फेन्सिंग लावले. त्यानंतरही पुन्हा दोन वर्षांनी सफारीतील बिबट्याने नऊ वन्यप्राण्यांना ठार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे सोलर फेन्सिंग केल्यानंतर त्याची तांत्रिक तपासणी केली होती का? कोणाकडून केली होती असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने आता उपस्थित केले जात आहे. 

प्रकरणाच्या चौकशीची मागणी
सोलर फेन्सिंगची तपासणी झाली असती तर बिबट्याचा पिंजऱ्यात शिरकाव करू शकला नसता.  या कामातच गैरप्रकार झाला का असाही सवालही वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे. तसेच त्रुटी ठेवणाऱ्या संबंधित वनाधिकाऱ्यावर वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे. संबंधित वनाधिकाऱ्यांला पाठीशी घालण्याचा प्रयत्नही एफडीसीएमच्या माध्यमातून केला जात असल्याची चर्चाही यानिमित्ताने केली जात आहे.

गोरेवाड्यातील खुल्या पिंजऱ्यात शिरून नऊ वन्यप्राण्यांना ठार मारण्याची घटना गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाईल. गरज वाटल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. रामबाबू, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ.

Web Title: Leopard Attack on Wild Animal in Cage

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com