नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीनेच होणार...

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक आता एकसदस्यीय पद्धतीनेच होणार...

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली बहुसदस्यिय प्रभाग रचना अखेर राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे एकसदस्यी प्रभाग रचनेनुसार प्रभागांचे प्रस्ताव तयार करून जिल्हा अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत.

एप्रिल-2020 मध्ये होणाऱया नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने सुमारे 27 बहुसदस्यीय प्रभाग रचनेचे प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले होते. परंतु, राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप सरकारच्या काळात घेतलेला बहुसदस्यिय प्रभाग रचनेचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात रद्द केला.

त्यामुळे, पुन्हा एकसदस्य प्रभाग रचनेनुसार महापालिकेची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार,सध्या अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येचा विचार करून,एकसदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना करून, प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी,महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्या एकत्रीत समितीपुढे मान्यतेकरीता येत्या 8 जानेवारी पर्यंत सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना सांगितले आहे. 

तसेच या त्रिसदस्यीय समितीच्या मान्यतेनंतर प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरीता येत्या 13 जानेवारीपर्यंत सादर करण्यास आदेशित केले आहे.त्यामुळे नवी मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक एकसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सन 2011च्या जनगणनेनुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 11 लाख 20हजार 547 इतकी मतदारांची संख्या असून त्यात अनुसुचीत जातीचे 1 लाख 67 व अनुसुचित जमातीचे 18 हजार 913 इतके मतदार आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण 111 प्रभाग आहेत.

Web Title - navi mumbai corporation election will be single ward system

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com