पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रीपद?

पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्रीपदासह बीडचे पालकमंत्रीपद?

बीड : भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीत असलेल्या पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद निश्चित असल्याची माहिती आहे. त्यांचा परळीतून चुलत बंधु धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव झाला.  भाजप - शिवसेना एकत्र येत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा हालचालींना वेग आला आहे. संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत पंकजा मुंडे यांचेही नाव असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचीही माहिती आहे. 

मागच्या निवडणुकीत मोदी लाट तर होतीच शिवाय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती निधनाची सहानुभूती आणि पंकजा मुंडेंनी राज्यात काढलेल्या संघर्षयात्रेचा भाजपला फायदा झाला होता. मुंडेंची कन्या आणि त्यांची उपयुक्तता या दोन्ही कारणांनी पंकजा मुंडे भाजपच्या प्रमुख नेत्या आणि राज्य भाजपच्या सुकाणू समितीत होत्या. बीड जिल्ह्यात त्यांचे पाच समर्थक आमदार होते. जिल्ह्याबाहेरही त्यांना मानणारे अनेक आमदार होते. या सर्व कारणांनी मागच्या वेळी त्यांचा सुरुवातीलाच मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांना महत्वाची खाती आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले होते. आता मात्र परिस्थिती वेगळी झाली आहे. 

खुद्द पंकजा मुंडे यांचा पराभव होऊन त्यांच्या समर्थकांचीही संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. एकनाथ खडसे, विनोद तावडे, चांदशेखर बावनकुळे अशा उदाहरणांमुळे हा प्रश्न अधिक गडद होत होता. परंतु, मागच्या वेळेपेक्षा भाजपच्या जागा घटल्या आहेत. तसेच भविष्याचा विचार केला तर पंकजा मुंडे यांना दुखावून भाजपला परवडणारे नाही. 

आज जरी त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना दुखावले तर त्यांना मानणारा समाज भाजपपासून दुरावन्याची भीती असून याचा फटका भाजपला अहमदनगर, पुणे, नाशिक, बुलढाणा आदी जिल्ह्यांत बसू शकतो. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना पाहिल्याप्रमाणे बीडचे पालकमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती आहे. तर, त्यांच्यासाठी पाथर्डीच्या मोनिका राजळे आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी राजीनाम्याची तयारी दाखविली असली, तरी त्या विधानपरिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात जातील, असे बोलले जाते.  

Web Title : Pankaja Munde Will Get Cabinet minister And Guardian Minister Post ?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com