( BLOG ) रिमोट कंट्रोल ते ईव्हीएम - विनोद तळेकर

( BLOG ) रिमोट कंट्रोल ते ईव्हीएम - विनोद तळेकर

ठाकरे घराण्याचा 'रिमोट कंट्रोल ते ईव्हीएम' असा राजकीय प्रवास सुरू झालाय. कारण आदित्य ठाकरेंच्या रुपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. 

लुळ्यापांगळ्या लोकशाहीपेक्षा धट्टीकट्टी हुकूमशाही बरी, अशा आशयाची उघड भुमिका घेत एकेकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या कार्यपद्धतीचं समर्थन केलं होतं. पुढेही त्यांच्या या कार्यपद्धतीचा ठसा कायमच शिवसेनेवर राहिला. किंबहुना हुकूमशाही पद्धतीनेच शिवसेनेचा कारभार सुरू राहिल, याची आवश्यक ती काळजी बाळासाहेबांनी घेतली. बाळासाहेबांच्या राजकारणाचा बाजही त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच अगदी 'बोल्ड' होता. एखाद्या बड्या पत्रकाराच्या जाहीर मुलाखतीत वाईनचा ग्लास हाती घेऊन मोकळेपणाने बसताना बाळासाहेब कचरले नाहीत. अगदी हाती सिगार धरलेल्या बाळासाहेबांची छबीही अनेक छायाचित्रातून झळकलीय. आपल्या राजकीय जीवनात बाळासाहेब अगदी मोकळेपणाने वावरले, मात्र संसदीय पदापासून त्यांनी स्वत:ला कायमच दूर ठेवलं. शिवाय त्याची कोणतीही कारणमिमांसा करण्याची गरजही त्यांना भासली नाही. संसदीय राजकारणाच्या परिघाबाहेर राहून बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाची सूत्रं आपल्या हाती ठेवली. एवढंच नव्हे न्यायालयाच्या निर्णयावर टीकात्मक भाष्य न करण्याचा संकेतही बाळासाहेबांनी बऱ्याचदा झुगारून दिलाय. नव्वदच्या दशकात राज्यात सत्तेवर आलेल्या युती सरकारचा 'रिमोट कंट्रोल' आपल्या हाती असल्याची बाबही बाळासाहेब जाहीरपणे मान्य करत. कोणतंही संसदीय पद न स्विकारता सत्तेचा रिमोट कंट्रोल हाती ठेवण्याचा बाळासाहेबांचा शिरस्ता ठाकरे घराण्यात आजही कायम आहे. इतकच काय तर शिवसेनेतून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडलेल्या राज ठाकरेंनीही हा शिरस्ता अजूनपर्यंत पाळलाय. मध्यंतरी राज ठाकरेंनी निवडणुक लढवण्याचं सुतोवाच केलं होतं. मात्र आपल्या घोषणेवरून पुन्हा त्यांनी माघारही घेतली.

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्रं ठरवत शिवसेनेने साठच्या दशकात राजकीय क्षितीजावर पाऊल ठेवलं. पुढे यथावकाश शिवसेनेने संघटनेचं रुपडं सोडून राजकीय पक्षाचा अवतार धारण केला. या स्थित्यंतराच्या काळातही शिवसेनेवर बाळासाहेबांचीच एकहाती पकड कायम राहिली. आजही बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेनेत एकछत्री नेतृत्वच कायम आहे. पण शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत आता एक महत्वाचा अध्याय जोडला जाण्याची चिन्हं निर्माण झालीत. ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीने म्हणजे आदित्य ठाकरेंनी थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केलीय. आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतला सर्वात सुरक्षित मतदारसंघ शोधला जातोय. शिवाय भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचं पद्धतशीरपणे 'प्रोजेक्शन'ही केलं जातंय. या ना त्या कारणाने आदित्य यांची छबी माध्यमांमधून सतत झळकत राहिल याची नीट दक्षता घेतली जातेय. लोकसभा निवडणुकीपुर्वी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर येऊन भेट घेतली होती. युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपचा दूत म्हणून किशोर यांनी ठाकरेंची भेट घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. या भेटीदरम्यान किशोर यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी 'प्रोजेक्ट' करण्याचा सल्ला दिला असण्याची शक्यता आहे. तसं जरी नसलं तरीही आदित्य यांचं 'रिलॉन्चिंग' एखादा इव्हेंट करावा इतक्या पद्धतशीरपणे केलं जातंय, हे नक्की आहे. ठाकरेंनी चोखाळलेला हा नवा मार्ग त्यांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणार की नाही हे यथावकाश कळेलच, पण संसदीय परिघाबाहेर राहण्याचा ठाकरे घराण्याचा आजवरचा शिरस्ता मोडून वेगळी वाट निवडण्याची गरज ठाकरेंना आताच का भासली? हा प्रश्न त्यातून निर्माण झालाय. या कूटप्रश्नाची उकल जेव्हा होईल तेव्हा होईलच..पण आदित्य ठाकरेंनी संसदीय राजकारणावर विश्वास ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला असेल तर ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. किमान त्यानिमित्ताने 'रिमोट कंट्रोल ते ईव्हीएम' असा ठाकरे घराण्याचा प्रवास सुरू झालाय, हेही नसे थोडके..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com