ज्योती कुमारी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तूर्तास स्थगिती

ज्योती कुमारी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तूर्तास स्थगिती

पुणे - बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकडे यांना सोमवारी (ता. 24) फाशी देण्यात येणार होती. मात्र, शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. युक्तिवादानंतर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने फाशीच्या स्थगितीचा आदेश दिला, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील युग चौधरी यांनी दिली. त्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही दुजोरा दिला.

22 वर्षीय ज्योती कुमारी हिचा 1 नोव्हेंबर 2007 रोजी नोकरीचा शेवटचा दिवस होता. त्याच दिवशी आरोपींनी बलात्कार करून तिचा खून केला. याप्रकरणी सत्र न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना मार्च 2012 मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली होती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळून फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तो फेटाळला. त्यामुळे बोराटे आणि कोकडे यांच्या फाशीच्या शिक्षेचे वॉरंट सत्र न्यायालयाने काढले होते.

दया याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेच्या अंमलबजावणीस कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली, त्यामुळे फाशीच्या शिक्षेचे वॉरंट कधीही येऊ शकते, असा विचार करत बोराटे व काकडे सतत मृत्यूच्या छायेत जगले. ही बाब जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी आहे, असे दोघांनी याचिकेत नमूद केले होते. गृहविभाग आणि कारागृह प्रशासनाने हा विलंब केल्याचा युक्तिवाद ऍड. चौधरी यांनी केला. या प्रकरणात सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी युक्तिवाद केला.

Web Title: Accused Hanging Stop in Jyoti Kumari Rape case Crime High Court

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com