शेतकरी कर्ज मुक्त करणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकरी कर्ज मुक्त करणारच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray, Pune, Maharashtra

पुणे : राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांचे दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री जयंत पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे, कल्लाप्पाण्णा आवाडे, शिवाजीराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

सहकार आणि राजकारण क्षेत्र वेगळे असू शकत नाही : ठाकरे 
ठाकरे म्हणाले, सहकार आणि राजकारण क्षेत्र वेगळे असू शकत नाही. सहकार क्षेत्राने राज्याला अनेक दिग्गज नेते दिले. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकांच्या जीवनात गोडवा आणला. पण शेतकऱ्यांची अवस्था ऊसाच्या चिपाडासारखी होत आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली. यापुढील टप्प्यात दोन लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सन्मान योजना आणली जाईल. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची समिती गठीत करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नवीन शाखा मराठवाड्यात
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी मराठवाड्यात जालना येथे नवीन शाखा आणि त्यासाठी जमीन देण्यात येईल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले येईल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

पवार म्हणाले, ''वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही ऊस शेती संशोधनातील महत्त्वपूर्ण संस्था आहे. राज्यातील साखर उद्योगासाठीच नव्हे तर, देशभरातील कारखान्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. महाराष्ट्र राज्य साखर उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर होते. पण सध्या उत्तर प्रदेश स्पर्धेत पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पादन, उतारा वाढ आणि पाणी व्यवस्थापनाबाबत अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी साखर कारखान्यांनीही आपले योगदान द्यावे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी मराठवाड्यात जालना येथे नवीन शाखा आणि त्यासाठी जमीन देण्याबाबत मागील सरकारने आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही, याबाबत आर्थिक तरतूद करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्यातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार साथ मिळेल'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Farmers will be debt free said Chief Minister Uddhav Thackeray in Pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com