दोन लाखांवरील पीककर्ज माफ करण्याबाबत विचार करू - उद्धव ठाकरे

दोन लाखांवरील पीककर्ज माफ करण्याबाबत विचार करू - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray

पुणे - राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांचे दोन लाखांवरील पीककर्ज माफ करण्याबाबत विचार सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही योजना आणली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून काम करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.  

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठाकरे यांच्या हस्ते साखर कारखान्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री जयंत पाटील, आमदार अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राजेश टोपे, कल्लाप्पाण्णा आवाडे, जयप्रकाश दांडेगावकर, रोहित पवार, शिवाजीराव देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, ‘‘सहकार आणि राजकारण क्षेत्र वेगळे असू शकत नाही. सहकार क्षेत्राने राज्याला अनेक दिग्गज नेते दिले. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत असताना राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.’’ साखर उद्योगाला सक्षम करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

शरद पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य हे साखर उद्योगात देशात पहिल्या क्रमांकावर होते. पण सध्या उत्तर प्रदेश स्पर्धेत पुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे एकरी उत्पादन, साखरेच्या उताऱ्यात वाढ आणि पाणी व्यवस्थापनाबाबत अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी साखर कारखान्यांनीही आपले योगदान देण्याची गरज आहे.’’

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी मराठवाड्यात जालना येथे नवीन शाखा आणि त्यासाठी जागा देण्याबाबत मागील सरकारने आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केले नाही, याबाबत आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘‘सहवीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या उसाला अधिकचा दर देता येईल.’’

‘व्हीएसआय’ची जालन्यात नवीन शाखा 
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मराठवाड्यात जालना येथे नवीन शाखेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले.

आम्ही ‘अर्धवट’ नव्हतो...
आम्ही युतीच्या सरकारमध्ये होतो, पण अर्धवट होतो; म्हणजे सरकारमध्ये अर्धी भूमिका होती. पण याचा अर्थ आम्ही ‘अर्धवट’ नव्हतो. शब्दाचा अर्थ कसा लागेल सांगता येत नाही. म्हणून लगेच खुलासाही करावा लागतो. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता. पण त्याच्यावर फोडणी कोण देणार? अशी मिश्‍किल टिप्पण्णी ठाकरे यांनी केली.

चुकलो तर पवारच जबाबदार
साखर उद्योग विषयावर काही चुकून बोललो तर त्याला माझ्या वडिलांचे मित्र, ज्यांनी मला प्रेमाने आदेश दिला -‘उद्धव, तुला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी लागेल’- ती व्यक्ती याला जबाबदार असेल, असा ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता उल्लेख केला.

Web Title: The idea of a crop loan forgiveness over two lakhs uddhav thackeray
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com