‘नीट’ परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मूळ प्रत अनिवार्य 

‘नीट’ परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मूळ प्रत अनिवार्य 

पुणे - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची घेतली जाणारी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी (ता. ५) पार पडली. मात्र, ओळखपत्र म्हणून मूळ आधार कार्ड न आणल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. महाराष्ट्रातून एक लाख ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रश्‍न सोपे विचारले गेल्याने कटऑफ वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

‘नीट’ परीक्षेसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मूळ प्रत सोबत असणे अनिवार्य केले होते; पण अनेकांनी मूळ प्रतीऐवजी झेरॉक्‍स प्रत सोबत ठेवली होती. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षा देता येणार नसल्याने विद्यार्थी, त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना परीक्षेस बसू देण्याची विनंती केली; परंतु आधार कार्डची मूळ प्रत नसेल, तर परीक्षा देता येणार नाही, अशी त्यांची भूमिका कायम असल्याने काही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले. 

यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) ‘नीट’ची परीक्षा घेतली जात होती. या वेळी प्रथमच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) आज दुपारी दोन ते पाच या वेळेत ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, अमरावतीसह अन्य ठिकाणी परीक्षा झाली. 

सीबीएससीच्या तुलनेत ‘एनटीए’ने तयार केलेली प्रश्‍नपत्रिका अधिक सोपी होती. ही परीक्षा ७२० गुणांची होती. यामध्ये जीवशास्त्र ३६०; तर रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांच्या प्रश्‍नपत्रिका प्रत्येकी १८० गुणांच्या होत्या. जीवशास्त्र व रसायनशास्त्राच्या प्रश्‍नपत्रिकेत तुलनेने प्रश्‍न सोपे विचारले गेल्याने अनेक परीक्षार्थींना चांगले गुण मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा कटऑफ किमान दहा गुणांनी वाढेल; तसेच मराठा आरक्षण व आर्थिक मागास वर्गाच्या आरक्षणामुळे जागा वाढणार आहेत. त्याचाही परिणाम कटऑफवर होईल. गेल्या वर्षी खुल्या गटाचा कटऑफ ५३० गुणांचा होता, यंदा तो ५४० असेल, अस अंदाज खासगी क्‍लासचालक केदार टाकळकर यांनी वर्तविला आहे. 

जळगावात शर्टाच्या कापल्या कॉलर
जळगाव - ‘नीट’ परीक्षेसाठी कॉलर असलेले शर्ट घालून येण्यास मनाई केलेली असतानाही अनेक विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून परीक्षेसाठी आले. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शर्टच्या कॉलर कापण्यात आल्या आणि त्यानंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले.

Web Title: NEET Exam Student Examiner Aadhar Card

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com