खुशखबर! पुण्यात गणेशोत्सवात पार्किंग मोफत

खुशखबर! पुण्यात गणेशोत्सवात पार्किंग मोफत

पुणे  - थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने टाळे ठोकण्यात आलेला महात्मा फुले मंडईतील (कै.) सतीशशेठ मिसाळ वाहनतळ महापालिकेने ताब्यात घेऊन गुरुवारी पार्किंगसाठी उपलब्ध केला. विशेष म्हणजे, गणेशोत्सवानिमित्त वाहनचालक आणि भाविकांच्या सोयीसाठी पुढील काही दिवस या ठिकाणी मोफत पार्किंगची सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून बंद असलेला वाहनतळ सुरू झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

या वाहनतळाच्या ठेकेदाराकडे सुमारे 46 लाख रुपयांचे भाडे थकीत आहे, ते भरण्याबाबत वारंवार नोटीस बजावूनही ठेकेदाराने थकबाकी भरण्याकडे काणाडोळा केला होता, त्यामुळे महापालिकेने हा वाहनतळ "सील' केला होता. मात्र, गणेशोत्सवात मंडईसह बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात प्रचंड गर्दी असते. परंतु, ऐन गणेशोत्सवात हा वाहनतळ बंद राहिल्याने वाहने घेऊन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी होत्या. वाहनतळ बंद असल्याने वाहतूक कोंडी होऊन भाविकांसह या भागातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही गैरसोय होत असल्याचे दिसून आले. या पार्श्‍वभूमीवर ऐन उत्सवाच्या काळात भाविकांना पार्किंग सुविधा नसल्याकडे "सकाळ'ने लक्ष वेधले होते. त्यानंतर महापालिकेच्या मिळकत विभागाने मिसाळ वाहनतळाची साफसफाई करून तो सुरू केला. तसेच, गणेशोत्सव संपेपर्यंत मोफत पार्किंग सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

गणेशोत्सवात लोकांच्या सोयीसाठी महापालिकेचे कर्मचारी नेमून वाहनतळ सुरू करण्यात आला आहे. सध्या तरी तो मोफत असेल. हा वाहनतळ 24 तास सुरू राहणार आहे. 
- राजेंद्र मुठे, उपायुक्त, महापालिका 

Web Title: Parking free at Ganeshotsav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com