Pune Rain | मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली; पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

Pune Rain | मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली; पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच लोहगावात ३४, तर खडकवासला परिसरात २२ मिलिमीटर पाऊस झाला.

शहरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी वाढू लागली. दुपारी दोन-अडीच वाजता काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले आणि तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे पुणेकरांना गेल्या २५ सप्टेंबर रोजी शहरात पडलेल्या भयंकर पावसाची आठवण झाली. या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला.

शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, वारजे, कात्रज, धनकवडी, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे जोरात वाहू लागले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही मीटर अंतरावरच्या गाड्याही दिसत नव्हत्या.  

पावसाला सुरवात होताच शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा बाजीराव रस्त्यासारखा वर्दळीचा रस्ता निर्मनुष्य झाला. पावसाच्या भयंकर सरींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळे जण जागा मिळेल तेथे थांबले. त्यामुळे रस्त्यांवर फक्त बस आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. वाहनांचे दिवे लावून ही वाहने चालविली जात असली तरीही, त्यांची संख्या मात्र खूप कमी असल्याचे जाणवत होते.

रस्त्यांवर पाणीच पाणी 
पावसाच्या पाण्याचा जोर प्रचंड असल्याने अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्यांवर पावसाचे पाणी भरू लागले. एक-एक करत शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली जाऊ लागले. कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लष्कराला जोडणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले. या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. बाजीराव रस्त्यावरील सुरभी फर्निचरच्या लेनमधून मंडईकडे जाणारा रस्ता बंद केला. म्हात्रे पुलावर सांडपाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी आले होते.

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

का पडला पाऊस? 
शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला होता. त्याचवेळी अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली होती. शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्‍क्‍यांवर होते. वाढलेले तापमान आणि हवेतील बाष्प अशा स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडला, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

पावसात काय झाले?
  शहराच्या वेगवेगळ्या भागातील आठ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या
  सिंहगड रस्ता आनंदनगर येथील घरांमध्ये पाणी शिरले
  लॉ कॉलेज रस्त्यावर भक्ती मार्गावरील एका बंगल्यात पाणी

Web Title: Second Day Rain in Pune city

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com