अस्वस्थतेतून अजित पवारांनी राजीनामा दिला - शरद पवार

अस्वस्थतेतून अजित पवारांनी राजीनामा दिला - शरद पवार

पुणे - अजित पवार यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट करून, ‘‘राज्य सहकारी बॅंकेप्रकरणी काहीही संबंध नसताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माझ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे अजित पवार अस्वस्थ झाले होते, त्यातूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असावा,’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. अजित पवार यांच्या चिरंजीवांशी माझे बोलणे झाले, त्यांच्याकडून मला ही माहिती मिळाली, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे व जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट देण्यासाठी पवार पुण्यात आले होते. राज्य सहकारी बॅंकेच्या प्रकरणात ईडीने दाखल केलेला गुन्हा, पक्षाचे नेते आणि आमदार अजित पवार यांचा राजीनामा, या दिवसभरातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर पवार काय बोलणार, याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चॅनेल आणि पत्रकारांची गर्दी झाली होती. 

अजित पवार यांच्या राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी मला कोणतीही पूर्वसूचना अथवा कल्पना दिली नव्हती. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो होऊ शकला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून साहजिक ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. अजित पवार यांच्या चिरंजीवांशी चर्चा केल्यानंतर राज्य सहकारी बॅंकेच्या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल झाला, हे त्यांना सहन झाले नाही, त्यामुळे ते अस्वस्थ होते. राजकारण ज्या खालच्या पातळीवर गेले आहे, त्यामुळे राजकारणापेक्षा आपण शेती आणि उद्योगाकडे लक्ष देऊ, असे त्यांनी चिरंजीवांना सांगितले. अद्यापही त्यांच्याशी भेट झालेली नाही. भेट झाल्यानंतर चर्चा होईल.’’

शरद पवार म्हणाले...

पोलिस आयुक्तांनी केलेली विनंती आणि मुंबई येथे राज्यभरातून दाखल झालेले कार्यकर्ते यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून मी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले.
 

 आमच्या कुटुंबात कोणतेही वाद नाहीत. मतभेद नाहीत. कुटुंबप्रमुख म्हणून मी घेतलेला निर्णयच अंतिम असतो. कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख 
 

म्हणून मी यामध्ये लक्ष घालणार आहे. ती माझी जबाबदारी आहे.
 

 रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, हे नक्की झाले आहे. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांना या प्रकरणात ओढू नका.
 

 एखादी गोष्ट पटली नाही, तर तडकाफडकी निर्णय घेण्याचा अजित पवार यांचा स्वभाव आहे; पण पक्षाच्या, सहकाऱ्यांच्या आणि राज्याच्या काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. त्यांची भेट झाल्यानंतर या जबाबदारीची जाणीव मी त्यांना करून देईन.
 

     राजकारणाची पातळी घसरली आहे. यातून आपण बाहेर पडू. त्यापेक्षा शेती किंवा उद्योग करू, असा सल्ला त्यांनी दिल्याचे त्यांच्या मुलाकडून समजले.  
 

 लढाई सोडण्याचा अजित पवार यांचा   स्वभाव नाही.
 

    राज्य सहकारी बॅंकेच्या चौकशीसंदर्भात मला कोणतीही चिंता नाही, असे अजित पवार यांनी कुटुंबीयांना सांगितले. 
 

    राजीनामा देण्याआधी आणि नंतरही अजित पवार यांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही.
 

    अजित पवारांनी चिरजीवांना सांगितले, की तूसुद्धा राजकारणात राहू नको. व्यवसाय केलेला बरा. या क्षेत्रात न राहिलेले बरे.
 

    काल व परवा आम्ही एकत्र होतो. राज्यातील उमेदवारांबाबत चर्चा झाली. त्यांनी आपली स्वच्छ मते मांडली. मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा.


Web Title: Sharad pawar press conference in pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com