मुख्यमंत्रीजी, माणसे बुडाल्यावरच जाग येते का?...सांगलीकरांचा पत्रातून आक्रोश

 मुख्यमंत्रीजी, माणसे बुडाल्यावरच जाग येते का?...सांगलीकरांचा पत्रातून आक्रोश

प्रति, 

मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी तुम्ही यायला तसा थोडा उशीर झाला आणि ब्रह्मनाळला अनर्थ घडला... तसा या दोन घटनांचा फक्त योगायोग असला तरी तुम्ही दोन दिवस आधी आला असता तर यंत्रणा अधिक सर्तकपणे कामाला लागली असती. गेले काही दिवस कोल्हापूरचा महापूर गंभीर असल्याचे सरकार म्हणत होते, पण सरकारला आज कळले की सांगलीचा महापूर कैकपटीने गंभीर आहे...येथे 2005 पेक्षा स्थिती गंभीर होणार हे आम्ही चार दिवसांपूर्वीच आपल्यापर्यंत पोहोचविले होते, मात्र सरकार जरा लेटच इकडे आले ही गोष्ट मान्य करावी लागेल. 

सांगली, सांगलीची परिस्थिती गंभीर आहे, याचे भान आपणास हवाई पाहणी नंतर आले. पण यापूर्वीच सांगलीची अवस्था कोल्हापूरपेक्षा गंभीर आहे, याकडे माध्यमांनी लक्ष वेधले होते. मात्र मुळात आपणच येथे नेमलेल्या पालकमंत्र्यांनीच फार गंभीरपणे बघितले नाही. त्यामुळे एकूणच प्रशासन 2005 च्या पुराचा अनुभव पाठीशी असतानाही गाफील राहिले. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] खरे तर आपत्ती व्यवस्थापनचे पाच जिल्ह्यांचे मुख्य केंद्र सांगलीत आहे, तरीदेखील येथे पुरेशा बोटी आणि लाईफ जाकेटस्‌ नाहीत हे आता समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन फक्त कागदावर आहे याचा अनुभव 2019 च्या या प्रलंयकारी महापुराने दिला आहे. नुसते चटावरचे श्राद्ध आटपावे तशा या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका कधी तरी होत असाव्यात. कधी तरी एखादे प्रात्यक्षिक केले असावे एवढेच! संकट जनतेच्या जीवाशी खेळू लागले की, मग या यंत्रणा जाग्या होतात, याचा अनुभव आपल्याही सरकारमध्ये लोकांना घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे.

ब्रह्मनाळ ता. पलूस येथील पुराच्या बळींनी या संपूर्ण पुराबद्दलचं गांभीर्याने आता सरकार हादरले आहे. मात्र मागणी केल्यानंतर चार-चार तास बोटी किंवा मदत मिळणार नसेल तर ब्रह्मनाळ सारख्या घटना घडणारच! सुदैवाने 2005 च्या पुरात येथे एकही बळी गेला नव्हता. मात्र या पुराने कृष्णाकाठाला जीवितहाणीचा मोठा कलंक लागला आहे. 2005 च्या पुरात गेल्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात खिद्रापूर परिसरातून 6 जण वाहून गेले होते, मात्र सांगलीला जीवितहानीचा डाग लागला नव्हता. या महापुराने पुराचा 55 फुटांच्यावर जात नवा विक्रम नोंदविताना निम्म्याहून सांगली शहर बुडविले आणि नदीकाठच्या गावांना तर मगरमिठीच घातली. प्रशासन अजगरासारखे सुस्त असते त्याला हलवावे लागते असे दिवंगत नेते पतंगराव कदम नेहमी म्हणायचे त्याची प्रचितीच गाफील प्रशासनाने दिली. त्यामुळे पतंगरावांनी त्यावेळी हाताळलेल्या पुराची यावेळी फार आठवण आली. यावेळी पालकमंत्री कोण आहेत ते लोकांनाही माहीत नाही इतपत आपल्या सुभाषबापूंचा सांगलीशी संपर्क राहिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी नवेच आहेत त्यांना येथील पुराची पूर्व कल्पना नव्हती पण महापालिका प्रशासनाला या सर्वांचा दिव्य अनुभव होता. तरीदेखील पुरेशी तयारी या पुरासाठी केली नाही.

पाणी घरात आल्याशिवाय लोक घर सोडत नाहीत एवढीच तक्रार अधिकारी सांगत आहेत. पण या लोकांना 15 वर्षांपूर्वीपेक्षा भयंकर पूर येईल याची कल्पना दिली गेली नाही, हे वास्तव आहे. अलमट्टीमुळे पाणी तुंबते याचा अनुभव संपूर्ण मंत्रिमंडळला आणि नेत्यांना आहे तरीही कर्नाटकचे याबाबतीतील नाटकच आज पुन्हा आपण सांगत आहात; आणि आपण हवाई पाहणीनंतर खरी युद्धपातळीवर यंत्रणा हलली. ही पाहणी आधीच केली असती तर कदाचित एवढी झळ कृष्णाकाठाला लागली नसती. पुन्हा एवढे करूनही यंत्रणेने आपल्याला सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठी येथे उतरू दिले नाहीच (हवामान योग्य नसल्याने) सांगलीने खरे आपल्या पक्षाला भरभरून आमदार दिले, खासदार दिला तरी देखील सांगलीच्या बाबतीत थोडी कंजुषी आपल्या सरकारकडून होतेच आहे. सांगलीचे आपले अनेक दौरे याआधी रद्द झाले तसाच आजदेखील तुम्हाला सांगलीला हवाईची पाहणी करून न देता, न भेटता परतावे लागले. 

आता तर सांगलीची महापालिकाही आपल्याच पक्षाच्या अधिपत्याखाली आहे, जिल्हा परिषददेखील या साऱ्या यंत्रणा असताना आणि मातब्बर नेते मंडळी असताना सांगलीचा महापूर हा ज्या काळजीने हाताळणे अपेक्षित होते तसे घडले नाही. यंत्रणा मदतीला आल्या पण फार उशीर झाला. निसर्गाचा कोप कोणाच्याच हाती नसतो. यामध्ये एकवेळ मालमत्तेचे नुकसान झाले तर भरपाईने देता येते पण जीवितहानी ही कोणत्याही मदतीने भरून निघत नसते.

आज ब्रह्मनाळमधील जी 15 कुटुंबे उघड्यावर पडली त्यांना आर्थिक मदतीने त्यांचे नातेवाईक परत मिळणार नाहीत. यामध्ये एका बाळापासून वृद्धापर्यंत 15 जणांना जीवाची आहुती पुराच्या पाण्यात द्यावी लागली आहे. त्यांना वाचविण्यासाठी साध्या चांगल्या बोटी व लाईफ जॅकेट नसावेत हे दुर्दैव आहे. याच यंत्रणावर आधीच्याही सरकारमध्ये आपण विरोधीपक्ष असताना टीका होत होती. पण आपल्या सरकारच्या पाच वर्षांत पूरच आला नाही शेवटी आला आणि सांगलीचा घात करून गेला. अजूनही महापुराचे हे प्रलयंकारी रूप पाहता आपल्या मंत्र्यांनी येथे ठाण मांडून यंत्रणांना कार्यक्षम केले पाहिजे. येथील एका जीवरक्षक टिमने अनेकदा बोटीची मागणी वर्षानुवर्षे केली आहे तरी तिला एक साधी बोट मिळत नाही. आपले प्रशासन नुसते रस्त्यांच्या ठेकेदारांना मलई देते पण दहा वर्षांतून कधी तरी येणाऱ्या पुरासारख्या आपत्तीबाबत गाफील राहते. हा सिलसिला आघाडीच्या सरकारमध्येही होता आणि तोच अनुभव युतीच्या सरकारमध्येही पाहायला मिळतो आहे.

ही टीका करायची वेळ नाही पण ब्रह्मनाळच्या घटनेतील तान्हुल्या बाळाचा आणि आजीचा मृतदेहाचा फोटो पाहून सांगलीकर हळहळले. सिरीयातील शराणार्थी बचावासाठी जाताना एक मृत बालक समुद्र किणाऱ्यावर निपचिप पडलेल्या फोटोने जसे जग हळहळले तसेच मृत माता-बालकाचा फोटो पाहून आम्ही सारे सुन्न झालो. पूर अजूनही गंभीर पातळीवरच आहे. यापुढे पूर लवकर ओसरावा अशी कृष्णामातेला आपण प्रार्थना करू, पण प्रशासनाने यंत्रणा आजूनही वाढविण्याची गरज आहे कारण बोट मागितल्यावर दिवसभर मिळत नाही हा अनुभव अनेकांनी आमच्याकडे व्यक्त केला. 

कृष्णाकाठच्या लोकाच्या मालमत्तांचे, दुकानांचे आतोनात नुकसान झाले आहे, सर्व सरकारी मोजपट्टया बाजूला सारून आपण या सर्वांना नुकसान भरपाई द्यावी आणि यापुढे एकही जीवितहानी होऊ नये या प्रशासनाने दक्षता घ्यावी. स्वयंसेवी संस्थांनीही या महापुरात आपल्या जीवाचे रान केले आहे त्याची दखल घ्यावी आणि अलमट्टीचे भूत एकदाचे कायमचे निकालात काढावे त्याची भीती कृष्णाकाठाला प्रत्येक पावसाळ्यात आजून किती पुरात झेलत राहायची? एकाबाजूला निम्म्यापेक्षा अधिक भागात दुष्काळ दुसरीकडे प्रचंड पाण्याचे नियोजन नाही हे पूर्वीचेच दुखणे पार्टी विथ डिफरन्स असलेल्या आपल्या सरकारला शोभणारे नक्कीच नाही. आपल्या यंत्रणांकडून आता तरी पूरपरिस्थितीत सर्व सांगलीकर सुरक्षित राहतील एवढीच अपेक्षा आणि कृष्णेला शांत होण्याची सर्व सांगलीकरांची प्रार्थना! 

                                                      आपले 

                                               - सर्व सांगलीकर
 
Web Title: letter to CM Devendra Fadnavis by Citizens of flooded sangli

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com