मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहिल, असे शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगितले जाते. पण, दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री आमचाच, यावरुन वरचढीची चर्चा सातत्याने होत असते. अखेर सामना या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मुख्यमत्रीपदाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात ठरले आहे. या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल, असे त्यांनी म्हटले आहे. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?, असा सवाल शिवसेनेने उपस्थितीत केला आहे. 

राजकारणात कोणताही प्रश्न अनुत्तरित राहत नाही. वेळ आली की सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. उभ्या, आडव्या, तिरप्या शब्दांची कोडीही डोकी खाजवल्यावर सुटतच असतात. राजकारणातल्या प्रश्नांची कोडीही त्याच पद्धतीने सुटत असतात. युती आणि जागा वाटपाचा घोळ आता सुटला आहे. पण मुख्यमंत्रीपदाचे काय? मुख्यमंत्री भाजपचा की शिवसेनेचा?’’ सध्या हा प्रश्न चघळला जात आहे. मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आहेच हो, पण तो काही इतका जटील नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचे नेते सांगतात, ‘‘काळजी करू नका, मुख्यमंत्री आपलेच.’’ इकडे आम्हीही सांगतो, ‘‘पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!’’ हे असे आपापल्या कार्यकर्त्यांना सांगणे म्हणजे ते चुकीचे आहे असे नाही. 

मुख्यमंत्री शिवसेना आणि भाजपचाच होणार. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचे निकाल काय सांगतात? राज्यात शिवसेना-भाजप युतीवर जनतेने विश्वास टाकला आहे. उद्याची विधानसभा निवडणूकही ‘युती’ प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. राज्य घडवावे, लोकांना चांगले दिवस यावेत यासाठी सत्ता राबवावी हाच आमचा हेतू आहे. सत्तेच्या किल्ल्या जनतेची किंवा राज्याची लूट करण्यासाठी आम्हाला नकोत. ‘युती’च्या गाठी पुन्हा बांधल्या गेल्या आहेत त्या याच कार्यासाठी. सत्तेचा किंवा पदाचा अमरपट्टा या जगी कुणीच बांधून आलेला नाही. प्रत्येकाला एक दिवस रिकाम्या हातानेच निरोप घ्यायचा आहे याचे भान ठेवायला हवे. 

आज मुख्यमंत्री खुर्चीवर आहे म्हणून सत्ताधीश. नंतर विचारतोय कोण? देशातले असे अनेक ‘माजी’ आजही अंधारात चाचपडत आहेत. महाराष्ट्राचे भवितव्य शिवसेनेनेच घडवले आहे. लढा मराठीचा असेल नाही तर महाराष्ट्राच्या अखंडतेचा, प्रश्न रोजगाराचा असेल नाही तर शेतकऱ्यांचा. शिवसेना ठामपणे उभी आहेच. आम्ही आज सत्तेत तसे म्हटले तर आहोत. काही गोष्टी अवजड किंवा अवघड असू शकतात, पण सत्तेत असूनही पीक विमा योजनेतील गोंधळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही समांतर कामे सुरू केली. शिवसेनेचा मुख्यमंत्री खुर्चीवर असता तरी आम्ही यापेक्षा वेगळे वागलो नसतो. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही.

Web Title:shiv sena party chief uddhav thackeray speaks on cm post crises in between shiv sena and bjp on forthcoming vidhansabha election 2019

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com