शिवसेना मंत्रिमंडळात नवे चेहरे देणार

शिवसेना मंत्रिमंडळात नवे चेहरे देणार

शिवसेना मंत्रीमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्यांनी संधी देणार, याची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिले आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा केला असला, तरी ते मिळण्याची शक्यता धूसर आहे. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले युवा नेते आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री मिळणार का, याकडेच राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या नेत्यांच्या अपेक्षेनुसार मतदारांना त्यांच्या पारड्यात दान टाकले नसले, तरी सर्वांत मोठा पक्ष भाजपच ठरला आहे. त्यांचे 105 आमदार निवडून आले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपबरोबर शिवसेनेच्या ही जागा घटल्या असल्या तरी शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. भाजप-शिवसेना युती सत्तेवर आली, तरी ठरल्यानुसार शिवसेनेला सत्तेत समसमान वाटा मिळणार का, त्यासाठी शिवसेना किती आग्रही भूमिका घेणार, यासंदर्भात यापुढेही चर्चा सुरूच राहतील. 

शिवसेनेचा हिस्सा वाढणार
युतीतील जागावाटपात भाजपकडे तुलनेने सेफ मतदारसंघ होते. विरोधकांच्या मतदारसंघात लढण्याची जबाबदारी भाजपपेक्षाही शिवसेनेवर जास्त होती. भाजपच्या आमदारांसोबत, अपक्ष व अन्य आमदारांची संख्या गृहीत धरली, तरी शिवसेनेला बाजूला ठेवत भाजप यावेळी सत्ता राबवू शकणार नाही. त्यामुळे, मंत्रीमंडळातील शिवसेनेचा हिस्सा वाढणार आहे, त्यासाठी किती आक्रमक भूमिका घ्यावयाची ते शिवसेनेला ठरवावे लागेल. 

विधान परिषदेतील वर्चस्व कमी होणार 
शिवसेनेचे वरीष्ठ नेते विधान परिषदेत असल्याने, गेल्या मंत्रिमंडळात त्यांनाच अधिक संधी मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील एकूण 25 कॅबिनेट मंत्र्यांपैकी शिवसेनेचे सहा कॅबिनेट मंत्री होते. त्यापैकी एकनाथ शिंदे सोडल्यास, अन्य पाचही जण विधान परिषदेतील आमदार होते. त्यामुळे लोकांमधून निवडून आलेल्या विधानसभेतील आमदारांमध्ये नाराजीचा सूर होता. मंत्रिमंडळातील एकूण अठरा राज्यमंत्र्यांपैकी सातजण शिवसेनेचे होते. ते सातहीजण विधानसभेचे सदस्य होते. 

यावेळी जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत हे कॅबिनेट मंत्री निवडणुकीच्या रिंगणात होते. सुभाष देसाई हे मंत्रीमंडळात कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाकर रावते यांना स्थान मिळण्याची शक्यता कमी असून, रामदास कदम यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, हा मुद्दा चर्चेचा राहील. या तीनही विधान परिषदेतील सदस्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊ नये, असा शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील नवे चेहरे शिवसेनेकडून निवडले जाण्याची शक्यता आहे. 

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद? 
आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात स्थिरावत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, अशी घोषणा करण्यात येत असली, तरी ते शक्य नसल्याची जाणीव शिवसेना नेतृत्वालाही आहे. राज्यात युतीमध्ये भाजपचे वर्चस्व शिवसेनेला मान्य करावेच लागेल. आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविण्याची शक्यता आहे. त्यामुळे, त्यांचा शिवसेनेच्या आमदारांशी थेट संपर्क वाढेल. राज्यातील विषयांबाबत भूमिका घेताना, त्यांची माहितीही वाढत जाईल. उपमुख्यमंत्री पदामुळे सर्व विभागातील मंत्र्यांशी त्यांचा संपर्क राहील. शिवसेना नेते म्हणून त्यांची जागा अधिक बळकट होत जाईल. त्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांच्याकडे कोणते खाते येते, तेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

शिवसेनेचे नवे चेहरे
रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री अर्जून खोतकर व विजय शिवतारे हे शिवसेनेचे तीन मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुभाष देसाई व रामदास कदम हे विधानपरिषदेचे सदस्य, एकनाथ शिंदे पुढील मंत्रीमंडळातही राहण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत चारच महिन्यांपूर्वी मंत्री झाल्यानंतर, विधानसभेवर निवडून आल्याने, त्यांचीही जागा कायम राहील. दिवाकर रावतेंची शक्यता कमी असल्याने मंत्रीमंडळात कॅबिनेटच्या दोन-तीन जागांवर नवे चेहरे येतील. राज्यमंत्र्यांपैकी रविंद्र वायकर, संजय राठोड यांना कॅबिनेटवर संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यमंत्र्यापैकी गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, दादा भुसे हे कायम राहतील. पश्चिम महाराष्ट्र, तसेच विदर्भ व मुंबईतील आमदाराला संधी मिळू शकते.

Web Title: Shivsena introduce new faces in Maharashtra Cabinet

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com