टिकटॉक स्टारची गोळ्या घालून हत्या

टिकटॉक स्टारची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्लीः टिकटॉक या सोशल मीडिया ऍपवर प्रसिद्ध असणाऱ्या 27 वर्षीय जीम ट्रेनर मोहित मोर याची मंगळवारी (ता. 21) रात्री भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. टिकटॉक ऍपवर मोहित मोर याचे 5.17 लाख फॉलोअर्स होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी रात्री तिघांनी मोहित मोर याची गोळ्या घालून हत्या केली. मोहित सहा वाजण्याच्या सुमारास एका फोटोकॉपी शॉपमध्ये बसला होता. यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीच्या अधारे आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नजफगढ पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहीत हरियाणामधील बहादूरगड येथील असून दिल्लीत राहत होता. रविवारी द्वारका येथे गँगवॉर झाले होते. यामध्ये दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान मोहित मोर याची हत्या झाली आहे. मोहितच्या हत्येचा गँगवॉरशी काही संबंध आहे का, याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. मोहितविरोधात कोणताही गुन्हा दाखल नव्हता.'

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'मोहितच्या मोबाइलची पाहणी केली असता गेल्या काही दिवसांत त्याने अनेकांशी संवाद साधल्याचे दिसत आहे. अनेकांशी त्याची मैत्री झाली होती. त्याच्या हत्येचा यापैकी कोणाशी संबंध आहे का, याबाबत तपास करत आहोत. मोहितच्या हत्येनंतर तिघेजण रस्त्यावर धावताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. यापैकी दोघांनी हेल्मेट घातले असून, एकाचा चेहरा दिसत आहे. शिवाय, ज्या दुचाकीवरून आले ती दिसत असून, नंबर प्लेटच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पण ही स्कूटर चोरीची असावी असा अंदाज आहे.'

मोहितच्या वडिलांचे निधन झाले असून, त्याच्या मागे आई आणि भाऊ असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोहितचे कोणाशी भांडणं अथवा शत्रु निर्माण झाले होते का, याबद्दलची माहिती पोलिस चौकशीदरम्यान घेत करत आहेत.

Web Title: TikTok celebrity and gym trainer Mohit Mor gunned down in Delhi

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com