आई-वडिलांनी केला पोटच्या मुलाचा खुन

आई-वडिलांनी केला पोटच्या मुलाचा खुन

ठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली.
अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक, टोप-कासारवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील अरुण सखाराम वाळवेकर (५५), आई रेखा (४०, दोघे रा. पाटील टेक, टोप) व त्यांचे साथीदार सूरज रामचंद्र ठाणेकर (२४), अविनाश ऊर्फ बबलू अनिल जगताप (२२), अभिजित दिनकर सूर्यवंशी (२६, रा. सर्व मनपाडळे) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - अनिकेत ऊर्फ अभिजित याचा डंपर होता. त्याने तो वर्षापूर्वी विकला. त्यानंतर तो दुसऱ्याच्या ट्रकवर काही महिने चालक म्हणून कामास होता. त्याने अनेकदा वाहन घेणे-विकणे असे करून दहा ते पंधरा लाख रुपये कर्ज केले होते. याशिवाय, त्याला दारूचे व्यसन होते. तो सातत्याने दारूच्या आहारी जाऊन घरात पैशांवरून भांडणे करीत होता. शनिवारी (ता. ४) रात्री आठच्या सुमास तो दारू पिऊन घरी आला. त्याने वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. या कारणावरून त्याने भांडण करून गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून वडील व आई अशा दोघांनी मिळून त्याला ठार करण्याच्या उद्देशाने घरातील विष पाजले. ते पिल्यानंतर त्याने प्रचंड दंगा व ओरडाओरड केली. 

पोलिसांनी सांगितले, की याच दरम्यान रेखा यांचे मानलेले भाऊ सूरज व अविनाश ‘एमआयडीसी’तून कामावरून परत मनपाडळेला घरी जात होते. गोंधळ ऐकून दोघे घरात आले. या वेळी अनिकेतने आणखी गोंधळ घालण्यास सुरवात केली. चौघांनी मिळून गळा दाबून त्याला ठार केले. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, यावर चर्चा केली. या वेळी त्याला जाळून टाकायचे किंवा त्याची विल्हेवाट लावायचे, असे ठरले. त्यानंतर सूरज व अविनाश मनपाडळेत आले. त्यांनी दुसरा मित्र अभिजित सूर्यवंशी याची मदत घेण्याचे ठरविले. त्याला सोबत घेऊन ते पुन्हा टोपला आले. मध्यरात्री एकच्या दरम्यान दोघे मोटारसायकलवर बसले. दोघांच्या मध्ये मृत अनिकेतला घेऊन मनपाडळे-अंबप रोडवर आले. त्याठिकाणी त्यांनी दोरखंडाने मृत अनिकेतचे हात, पाय, गळा बांधला. दोरीबरोबर दगड बांधून त्याचा मृतदेह विहिरीत फेकला व दोघेही पसार झाले.

दरम्यान, चार दिवसांनंतर मंगळवारी (ता. ७) मृतदेह पाण्यावर आला. या खुनाचे गूढ उकलणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिस चार-पाच दिवस कसून शोध घेत होते. विविध ठिकाणी छायाचित्र वितरित करणे, चौकशी करणे, बेपत्ता तक्रारींची माहिती घेणे सुरू होते; परंतु तपासात यश मिळत नव्हते. दोन दिवसांपूर्वी पाटील टेक येथून एक तरुण गायब असल्याची व त्याची तक्रार दिलेली नसल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी वाळवेकर कुटुंबीयांवर पाळत ठेवली. त्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेतले; तेव्हा गुन्ह्याची उकल झाली. पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, उपनिरीक्षक असमा मुल्ला, बालाजी घोळवे, दादा माने, विकास माने, विशाल उबाळे, नंदू घुगरे यांनी तपास केला.

त्याचा सर्वांनाच त्रास
अनिकेत ऊर्फ अभिजितचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे; परंतु त्याच्या व्यसनाधीनतेला कंटाळून काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी इचलकरंजीला परत गेली. त्याच्या व्यसनाला आई-वडील, पत्नी सर्वजण कंटाळले होते. यातूनच त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला, असे संशयितांनी कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: youth murder by his own parents in Kolhapur

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com