आता सुक्या कचऱ्याची समस्या मिटणार

आता सुक्या कचऱ्याची समस्या मिटणार


मुंबई: महापालिकेने २ ऑक्टोबर २०१७ पासून गृहनिर्माण सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या सोसायट्या आणि १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, हॉटेल व आस्थापनांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. त्यापेक्षा कमी आकार असलेल्या सोसायट्यांतील रहिवाशांकडून ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते; मात्र, पालिकेच्या वाहनांमधून हा कचरा एकत्रच नेला जात असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून पालिकेला आल्या आहेत. त्यामुळे सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पालिकेने खासगी संस्थेकडून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओल्यासोबत सुका कचराही डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन कचऱ्याची समस्या आणखी गंभीर होऊ नये यासाठी सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांत स्वतंत्र प्रकल्प सुरू करणार आहे. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात येणार असून, कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन सुका कचरा गोळा करणार आहेत.


या कामासाठी पालिकेकडून जागतिक पातळीवर निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात पहिल्या टप्प्यात शहरासाठी 'नेप्रा' ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीकडून लवकरच काम सुरू केले जाणार आहे, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या 'स्वच्छ भारत अभियान'चे समन्वयक आणि जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

Web Title Now the problem of dry waste will be solved


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com