निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव भडकले

 निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव भडकले


नाशिक - केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालताच त्याचे पडसाद स्थानिकसह आशिया खंडातील बाजारपेठेवर उमटले आहेत. आशिया खंडातील सगळ्या देशांमध्ये कांद्याचे भाव दीड ते दोन डॉलर, म्हणजेच शंभर ते सव्वाशे रुपयांनी भडकले आहेत. त्याचवेळी राज्यातील बाजारपेठेत भावातील घसरण कायम असून, २४ तासांमध्ये आज क्विंटलला दोनशेची घट झाली आहे.

आशियामधील ग्राहकांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. भारताच्या बंदीनंतर बांगलादेशसारख्या देशांनी म्यानमार, इजिप्त, तुर्की आणि चीनसारख्या देशांकडे पाठ फिरवली आहे. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताने २.२ दशलक्ष टन कांद्याची निर्यात केल्याचे भारतीय कृषी व प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. कांद्याचे भाव कडाडताच आशिया खंडातील ग्राहकांनी ‘कांद्याचे दर वेडे झाले आहेत,’ अशी संतप्त प्रतिक्रिया नोंविण्यास सुरवात केली आहे. काठमांडू ते कोलंबोपर्यंतच्या गृहिणींना ‘बजेट’ कोलमडण्याची भीती वाटू लागली आहे. काठमांडूतील ग्राहक कांद्याचे भाव दुप्पट झाल्याची तक्रार करू लागले आहेत. 

२०१३ नंतरचे सर्वाधिक भाव बांगलादेशची राजधानी ढाकामधील ग्राहकांना किलोभर कांद्यासाठी १२० टका म्हणजेच, १.४२ डॉलर एवढा भाव द्यावा लागतोय. हा भाव मागील पंधरवड्याच्या दुप्पट आहे. एवढेच नव्हे, तर डिसेंबर २०१३ नंतरचा हा सर्वाधिक भाव असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. याखेरीज आशियाप्रमाणे युरोपमध्ये कांद्याचे भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, श्रीलंकासारख्या देशांनी यापूर्वी इजिप्त आणि चीनकडे कांद्याची मागणी नोंदवली आहे. श्रीलंकेत कांद्याचे दर एका आठवड्यात पन्नास टक्‍क्‍यांनी वधारून किलोला २८० ते ३०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. मात्र, भारतीय कांद्याचे सर्वांत मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे आयातदार मलेशियाला ही बंदी काही काळापुरती असेल, असे वाटते.


Web Title: Onion prices fluctuate in Asia after export ban

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com