नवरात्रीचे सुरुवातीचे काही दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

नवरात्रीचे सुरुवातीचे काही दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई: गणेशोत्सवादरम्यान पाऊस पडल्याने उत्सवप्रेमी मुंबईकर नवरात्रीमध्ये तरी धमाल करता येईल अशी अपेक्षा बाळगून आहेत. मात्र, आता या काळातही दमटपणा आणि पाऊस कायम राहण्याचा अंदाज असून, नवरात्रोत्सवातील गर्दीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस अजूनही राजस्थानातून माघारी न फिरल्याने नवरात्रीचे सुरुवातीचे काही दिवस गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या पावसाची शक्यता आहे.

परतीच्या पावसात गडगडाट आणि लखलखाट होतो. त्यामुळे नवरात्रीसाठी मोकळ्या मैदानात जमणाऱ्या व्यक्तींनी पूर्वसूचना आवर्जून पाहाव्यात, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे. हवामान विभागाने ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीसाठी जारी केलेल्या पूर्वानुमानानुसार मध्य भारतात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. हवामान विभागाच्या 'मौसम' या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार शुक्रवारपासून सोमवारपर्यंत ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. १ आणि २ ऑक्टोबर रोजी त्यापेक्षा थोडा अधिक पाऊस असू शकेल.


मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी ७.३० पर्यंतच्या बारा तासांमध्ये हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत पावसाची उपस्थित नव्हती, मात्र दुपारी ४.३० नंतर ढग दाटून आले. मुंबई शहर, नवी मुंबई आणि ठाणे येथे काही ठिकाणी जोरदार सरींनी उपस्थिती लावली. उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण यामुळे हा पाऊस पडल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले. गुरुवारी सायं. ५.३० पर्यंत कुलाबा येथे १४.० तर सांताक्रूझ येथे ०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


पुण्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने घातलेला धुमाकूळ आणि उडालेला हाहाकार पाहून मुंबईकरांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी शहरात संध्याकाळनंतर जोरदार पाऊस कोसळला. आज, शुक्रवारी मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज असून, रविवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवावरही पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे.


Web Title : Rain likely with thunderstorms in the first few days of Navratri
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com