#SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन

#SaamTvNo1 ‘साम टीव्ही’ नंबर वन

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’चा भाग असलेले ‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीत अव्वल ठरले आहे. बार्क (BARC) या संस्थेच्या ३० व्या आठवड्याच्या रेटिंगनुसार प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे सारत ‘साम टीव्ही’ने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या आठवड्यात २१.३४ टक्के प्रेक्षकांची पसंती ‘साम टीव्ही’ला मिळाली आहे. ‘साम टीव्ही’ने ५७ जीआरपी मिळवत नंबर एकवर आपली मोहोर उमटवली आहे. बातम्यांमधील वेगळेपणा आणि सत्याची बाजू मांडत, सकारात्मकतेला दिलेले प्राधान्य यामुळे ‘साम टीव्ही’ चॅनेलने गेल्या ६ महिन्यांत क्रमांक ५ वरून थेट क्रमांक १ चा पल्ला गाठत सर्वांत वेगवान न्यूज चॅनेलचा मान मिळवला आहे. सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांमध्ये ‘साम टीव्ही’ लोकप्रिय होत असल्याचे बार्कच्या अहवालानुसार सिद्ध झाले आहे.  

‘साम टीव्ही’ न्यूज चॅनेल गेले काही महिने सातत्याने आणि वेगाने प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. ‘बार्क’च्या ३० व्या आठवड्याच्या प्रेक्षकांच्या रेटिंगनुसार एबीपी माझा, झी २४ तास, नेटवर्क १८ लोकमत, टीव्ही ९ यांसारख्या प्रस्थापित न्यूज चॅनेलना मागे टाकण्याची किमया साम टीव्ही न्यूजने साधली आहे. ‘साम’च्या निष्पक्ष बातमीपत्रांमुळेच हे साध्य झाले आहे. सर्व न्यूज चॅनेलच्या बातमीपत्रांमध्ये साम टीव्ही न्यूजचे तब्बल ३५ कार्यक्रम टॉप १०० मध्ये झळकल्याने याही स्पर्धेत ‘साम’ने पहिल्या क्रमांकाचे स्थान बळकट केले आहे. यात स्पॉटलाईट, व्हायरल सत्य, ‘टॉप ५० न्यूज’, ‘इथे नोकरी मिळेल’, मेगा प्राईम टाईम, ३६ जिल्हे ३६ रिपोर्टर या बातमीपत्रांचा समावेश आहे. याशिवाय, आज दिनांक, सरकारनामा ३६०, आज काय विशेष, साम अपडेट या बातमीपत्रांनाही विशेष पसंती मिळत आहे. 

‘व्हायरल सत्य’ हेल्पलाईन
समाजमाध्यमांमध्ये वाट्टेल त्या गोष्टी पसरवून सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या मानसिकतेला लगाम घालण्याच्या हेतूने ‘व्हायरल सत्य’ हा कार्यक्रम साम टीव्हीने सुरू केला आणि आता या कार्यक्रमातून साम टीव्हीची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. आता व्हायरल सत्य शोधण्यासाठी साम टीव्हीने हेल्पलाईनही सुरू केली आहे आणि अशी हेल्पलाईन सुरू करणारे साम टीव्ही हे पहिलेच न्यूज चॅनेल ठरले आहे. ८४२४००८४२५ हा या हेल्पलाईनचा क्रमांक आहे. या क्रमांकावर प्रेक्षक व्हायरल व्हिडीओ व्हॉट्‌सॲप करू शकतात आणि त्या व्हिडीओची सत्यता साम टीव्हीची व्हायरल सत्य टीम पडताळून घेते. त्यातून व्हायरल व्हिडीओंमागचे सत्य प्रेक्षकांसमोर साधार मांडले जाते, हेच वेगळेपण प्रेक्षकांनाही भावते आहे. यामुळेच ‘व्हायरल सत्य’ हा कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय ठरला आहे.

इथे नोकरी मिळेल
महाराष्ट्रातल्या युवकांना सार्वजनिक आणि सरकारी नोकर भरतीची इत्थंभूत माहिती उपलब्ध व्हावी म्हणून साम टीव्हीने ‘इथे नोकरी मिळेल’ हा कार्यक्रम दररोज प्रसारित करण्यास सुरुवात केली आणि त्याला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरघोस पसंती दिली. साम टीव्हीने सातत्याने लोकाभिमुख बातम्यांची निवड आणि प्रसारण केले. वाहिनीने नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक समाजनिर्मितीला आपल्या कार्यक्रमांमधून प्राधान्य दिले आहे. त्यातूनच साम टीव्हीला प्रेक्षकांची पोचपावती मिळाली आहे.

Web Title: SaamTv No1

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com