विखे, थोरात यांच्यावर माझे सारखेच प्रेम, तर शरद पवार देव माणूस : इंदुरीकर महाराज

विखे, थोरात यांच्यावर माझे सारखेच प्रेम, तर शरद पवार देव माणूस : इंदुरीकर महाराज

संगमनेर (नगर) : ''माझे विखे आणि थोरात घराण्यावर सारखेच प्रेम असल्याचे सांगत, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना देव मानणारा माणूस म्हणून उभा महाराष्ट्र मला ओळखतो. दिवंगत बाळासाहेब विखेचे सर्व गुण खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे आले. तसेच शरद पवारांचे सर्व गुण आमदार रोहित पवारांकडे आले आहेत,'' असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी केले. 

तालुक्यातील ओझर बुद्रूक येथे शनिवार ( ता. 25 ) रोजी वाढदिवस सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंदुरीकर महाराज म्हणाले की, राजकारण आणि धार्मिकता या बाबी रक्तातच असाव्या लागतात. दुसऱ्याचे पाहून या गोष्टी जमत नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचा सन्मान राखीत इंदुरीकरांनी त्यांच्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत बॅलन्स केला.

राजकारणाचे स्थानिक पातळीवर होणारे परिणाम यावर प्रत्येक कीर्तनातून परखड़ व मार्मिक भाष्य करणाऱ्या इंदुरीकरांनी तुम्ही जसा तान्हाजी सिनेमा एका थिएटरात बसून एकत्र पाहिला, तसे तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एकत्र बसायला सांगा, असा सल्लाही राज्यकर्त्यांना दिला.

या वेळी निवृत्ती महाराजांची घोड्याच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांच्यासमवेत रथावर शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे आरुढ झाले होते. तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभही यावेळी झाला.

''आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचे काम करणारे, हसता हसता चुकांवर नेमके बोट ठेवणारे, अंधश्रध्देवर प्रहार करुन, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे महाराज समाजात प्रेम आपुलकी, एकोपा निर्माण करीत आहेत. मनातील द्वेषाची जळमटे दूर करण्याचे व केवळ उपदेश करुन नाही, तर प्रत्यक्ष अनाथ, गरजू मुलांसाठी शिक्षण व निवासाची सोय त्यांनी केली आहे. ही आपणासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे," अशी भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com