अमेरिकेत 'स्वच्छ भारत'चा डंका

अमेरिकेत 'स्वच्छ भारत'चा डंका

न्यूयॉर्क - भारतात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवड्यात 2019च्या ग्लोबल गोलकीपर ऍवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. अमेरिकेतील बिल आणि मेलिंडा गेट्‌स फाउंडेशकडून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.

भारतात "स्वच्छ भारत मिशन' राबविल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. 24 सप्टेंबर रोजी विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार असून, त्या वेळी जागतिक पातळीवरील नेते आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना मोदी हे संबोधित करणार आहेत. मोदी पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेत दाखल होणार असून, त्या दौऱ्यावेळी ते हा पुरस्कार स्वीकारतील. जागतिक पातळीवरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या देशात कार्य करणाऱ्या राजकीय नेत्याला हा पुरस्कार दिला जातो.


दक्षिण आशियाई अमेरिकी नागरिकांच्या प्रभावशाली गटाने मोदींना हा पुरस्कार देण्यास विरोध दर्शविला आहे. या गटाने बिल आणि मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनला एक पत्र लिहिले असून, मोदींना जाहीर झालेला हा पुरस्कार फाउंडेशनने मागे घ्यावा, असे त्यात म्हटले आहे. मोदींच्या सत्ताकाळात भारतात मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याबद्दल पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गेट्‌स फाउंडेशनने मात्र आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Web Title: Swatch Bharat Abhiyan Global Goalkeeper Award America
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com