'शिवसेनेसोबत जाणार नाही'- शरद पवार  

'शिवसेनेसोबत जाणार नाही'- शरद पवार  


मुंबई : राज्याचे निवडणूक निकाल आणि त्यांचे कल पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, त्यावर भाष्य केले. यात त्यांनी राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पवार यांनी उपहासात्मक टीका केली. शिवसेनेसोबत संभाव्य युतीची शक्यता यावेळी पवारांनी फेटाळून लावली. 

साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानणार : पवार

शरद पवार म्हणाले, 'आमचा मित्रपक्ष काँग्रेस आहे आणि काँग्रेससोबत आम्ही काम करणार. निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रितपणे काम करत आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या निवडणुकीत असं दिसतंय की, लोकांना सत्तेचा उन्माद लोकांना पसंत पडलेला नाही. सत्ता येते-जाते पण, जमिनीवर पाय ठेवून काम केलं नाही तर, लोक स्वीकारत नाही. त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. या निवडणुकीत पक्षांतराच्या निर्णयाला लोकांनी पाठिंबा दिलेला नाही. काही अपवाद वगळले तर, ज्यांनी पक्ष सोडला त्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. प्रथमदर्शीनी ज्यांनी पक्षांतर केले त्यांच्या विरोधात वातावरण दिसत आहे.' या निवडणुकीतील निकालानंतर आम्ही आता मित्र पक्षांनासोबत बैठक घेऊन, कामाचा आढावा घेऊ. निवडणुकीचा निकाल पाहता. अधिक जोमानं कामाला लागणं महत्त्वाचं आहे. नव्या नेतृत्वाला पुढे घेऊन आम्ही काम करणार आहोत. पक्षाला नवी उभारी देणार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव 

मोदी, शहा, फडणवीसांविषयी काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, 'या निवडणुकीच्या निमित्तानं मोदी, शहा आणि फडणवीस यांनी राज्याचा दौरा केला. त्यांनी यानिमित्तानं महाराष्ट्र दर्शन केलं. माझ्यावर टीका केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आता त्यांच्या महाराष्ट्र दर्शनाचा राज्याला फायदा होईल, अशी मला अपेक्षा आहे. बाकी ते जे ज्योतिष शास्त्र मांडत होते. त्याविषयी मला काही कल्पना नाही. त्यांच्याकडं सांगण्यासारखं नाही. त्यामुळं त्यांची फार दखल घेण्याची गरज नाही.'

शिवसेनेशी हातमिळवणी नाहीच
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी कराल का? यावर पवार म्हणाले, 'शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा काही विचार नाही. त्याची चर्चाही नाही. तो आमचा नाही. आमचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार आहोत.' दरम्यान, राज्यात शिवसेना-भाजपला राज्यात कोणी आव्हान देणारं शिल्लकच नाही, अशी चर्चा सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीला आव्हान दिले होते. राज्यभरात जाहीर सभा घेऊन त्यांनी शिवसेना-भाजपला घाम फोडला होता. त्यांच्या टीकेचा रोख प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेच होता. शरद पवार यांनी घेतलेल्या झंजावाती जाहीर सभांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली मजल मारता आली.

Web Title: vidhan sabha 2019 maharashtra result ncp leader sharad pawar press conference mumbai
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com