पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

 पवारांविरोधात बारामतीमध्ये कोण? 

बारामती शहर - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामानाट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस सावरली असून पवार बारामतीतून लढणार, हे निश्‍चित आहे. दुसरीकडे, या मतदारसंघात भाजप लढणार की शिवसेना, हेही अजूनही स्पष्ट नाही. शिवसेनेकडून ॲड. राजेंद्र काळे; तर भाजपकडून बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे यांची चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन दिवस झाले; पण बारामतीत अजूनही निवडणुकीचे वातावरण दिसत नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्याकडेच उमेदवारांचा कल असेल, असे सध्याचे चित्र आहे. 

युतीबाबतचा निर्णय होत नसल्याने भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसांत किती प्रचार करता येईल. ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असल्याने इतक्‍या कमी काळात अजित पवार यांच्यासारख्या उमेदवारासमोर आव्हान कसे उभे करायचे, असे प्रश्‍न त्यांना पडले आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बारामतीवर लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले असले तरी त्यांचे राज्यव्यापी दौरे व इतर व्यापामुळे त्यांनाही बारामतीकडे लक्ष देणे फारसे जमलेले नाही. कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न त्यांनी निश्‍चितपणे केला. मात्र ही विधानसभा नव्हे; तर २०२४ ची लोकसभा हे भाजपचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप बारामतीत जिंकण्यासाठी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती याबाबतची जबाबदारी असलेले नगरसेवक किरण गुजर यांनी दिली. तारीख निश्‍चित नसली तरी येत्या दोन दिवसांत ही तारीख निश्‍चित होईल, असे ते म्हणाले. 

Web Title: Who will fight against Ajit Pawar in Baramati

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com