पतीशी वारंवार होणाऱ्या भांडणाच्या रागातून पत्नीने केला पतीचा गळा दाबून खून

पतीशी वारंवार होणाऱ्या भांडणाच्या रागातून पत्नीने केला पतीचा गळा दाबून खून

कोल्हापूर - पतीशी वारंवार होणाऱ्या भांडणाच्या रागातून पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना साकोली कॉर्नर येथे घडली. सागर नारायण बोडके (वय ३२, रा. साकोली कॉर्नर) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर पत्नी निर्मला हिने शेजाऱ्यांना याची माहिती दिली व स्वतः जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

साकोली कॉर्नर येथील जिव्हाळा या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सागर व निर्मला बोडके आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह राहत होते. सात वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. याच इमारतीच्या तळ मजल्यावर त्यांचे बॅग विक्रीचे दुकान आहे.

सागर हा व्यसनी असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होता. तसेच सागर आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सहा महिन्यांपूर्वी सागरचे वडील नारायण यांचा मृत्यू झाला. यानंतर या पती-पत्नीमध्ये रोज काही ना काही कारणावरून वाद होत होता. आज निर्मला या आपल्या दुकानात बसल्या होत्या. 

या वेळी सागर तिथे मद्यधुंद अवस्थेत आला व त्यांनी निर्मला यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. सागर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने निर्मला यांनी दुकान बंद केले व त्या घरात गेल्या. घरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वेळी निर्मला यांनी जवळ असलेल्या क्रेप बॅंडेजने सागरचा गळा आवळला.यात त्याचा जागीच मृत्यू झाला. निर्मला यांनी याची माहिती शेजाऱ्यांना देताच ते अवाक्‌ झाले. त्यांनी घरात पहिले असता सागर हा हॉलमधील बेडवर निपचित पडला होता. निर्मला यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर होत आपल्या कृत्याची माहिती दिली. 

पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन आवश्‍यक सूचना केल्या. रात्री पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. 

नातेवाईकांना धक्का
निर्मला यांच्या बोंद्रेनगर येथील नातेवाईकांना या घटनेबाबत समजताच ते घटनास्थळी आले. निर्मला यांच्याकडून झालेल्या या कृत्यामुळे त्यांना ही धक्का बसला.

काचांचा खच
सागर व निर्मला यांच्यामध्ये आज घरातही जोरदार वादावादी झाली. यात हॉलच्या खिडकीच्या काचा फुटून त्याचा खच पडला होता. तर अन्य साहित्य ही तिथेच अस्ताव्यस्त होते. जवळच एक वरवंटा पडला होता. गळा आवळतानाच डोकेही त्यावर आपटल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: Wife kill husband in Kolhapur Sakolicorner

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com