सावधान ! हवेतून पसरतोय कोरोना? घरातही लावावा लागणार मास्क?

सावधान ! हवेतून पसरतोय कोरोना? घरातही लावावा लागणार मास्क?

आता सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. कोरोनाचा फैलाव हवेतूनही होत असल्याचा दावा जगभरातल्या शास्त्रज्ञांनी केलाय. नेमका काय आहे हा दावा आणि त्यावर जागतिक आरोग्य संघटनेचं काय आहे म्हणणं. पाहा...

कोरोना विषाणूनं संपूर्ण जगात अक्षरशः थैमान घातलंय. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातली आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागलीय. त्यातच कोरोनाचा प्रसार हवेतूनही होत असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे सगळ्यांचेच धाबे दणाणलेयत. जगभरातल्या तज्ज्ञांनी या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला पत्राद्वारे माहिती दिलीय. कोरोनाचं अस्तित्व हवेतही असतं, असं तब्बल ३२ देशांतल्या २३९ तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना विषाणू हवेत जिवंत राहू शकतो, याचे पुरावे आहेत. पण हा विषाणू हवेतून पसरतो का, या निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे.  यावर जागतिक आरोग्य संघटनेनं गाईडलाईन्स द्याव्यात, अशी मागणी या शास्त्रज्ञांनी केलीय.

हवेत असलेल्या सामान्य विषाणूच्या कणांमुळेही लोकांमध्ये संक्रमण पसरत आहे. तसंच कोरोना विषाणू हवेत दीर्घकाळपर्यंत जिवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो. गर्दीच्या बंदीस्त आणि हवा खेळती नसलेल्या जागी कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं जागतिक आरोग्य संघटनेला लिहिलेल्या पत्रात अभ्यासकांनी म्हटलंय.

हवेतून कोरोनाचा संसर्ग पसरत नाही. तर केवळ थुंकीच्या कणांद्वारे कोरोना पसरतो. हे कण कफ, शिंका आणि बोलण्यामुळे शरीरातून बाहेर पडतात. ते इतके हलके नाहीत की ते वाऱ्यासोबत दूरपर्यंत उडत जातात. ते लवकरच जमिनीवर पडतात, असं या आधी जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. 

मात्र, या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार शिंकल्याने, खोकल्याने किंवा मोठ्याने बोलल्यामुळे संक्रमित व्यक्तीच्या तोंडातून निघालेले छोटे ड्रॉपलेट्स हवेमध्ये तरंगून निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो. हे लक्षात घेता घरात देखील एन-95 मास्क घालणं आवश्यक आहे, याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष वेधलंय. 

हवेतून कोरोना विषाणू पसरण्याचा शास्त्रज्ञांचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनंही मान्य केलाय. कोरोना हवेतून पसरण्याचे पुरावे मिळाले आहेत, पण अंतिम निर्णयावर पोहचण्यासाठी आम्हाला अजून थोडा वेळ लागेल. तसंच, सार्वजनिक ठिकाणांवर हवेतून विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. पण कोरोनाचा प्रसार खरंच हवेमार्फत होत असेल तर जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com