कोकणातील पर्यटकांसाठी चांगली बातमी, किनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स 

साम टीव्ही
शुक्रवार, 26 जून 2020
  • आता कोकण किनाऱ्यावर 'जीवाचा गोवा'
  • कोकण किनाऱ्यांवर उभारणार बीच शॅक्स 
  • कोकणातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी निर्णय 

आता कोकणातही पर्यटकांना जीवाचा गोवा अनुभवता येणारंय. कोकणातल्या किनाऱ्यांवर शॅक्स उभारायला राज्य सरकारनं परवानगी दिलीय. 

स्वच्छ निळाशार समुद्र. मनमोहक आणि हिरवाईने नटलेला परिसर. यामुळे कोकण पर्यटकांना कायमच खुणावत आलंय. आता याच पर्यटनाला चालना देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर प्रायोगिक तत्त्वावर शॅक्सची बांधणी केली जाणारंय. 

पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातल्या वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातल्या केळवा आणि बोर्डी या ८ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. एका चौपाटीवर जास्तीत जास्त 10 शॅक्स उभारता येतील. या शॅक्सचे तीन वर्षांकरता वाटप करण्यात येईल. 15 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 12 फूट उंच या आकाराचे हे शॅक्स असतील. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येणारंय. कुटी मिळणाऱ्या व्यक्तीकरता परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल. तसंच या शॅक्सकरता पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार रुपये वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल. तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर ही अनामत रक्कम परत केली जाईल. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 यावेळेत ही शॅक्स खुली राहतील. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातल्या पर्यटनाला आणखी प्रोत्साहन मिळणारंय. तसंच, यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणारंय. त्यामुळे चला, येवा कोकण आपलाच आसा.


संबंधित बातम्या

Saam TV Live