गाव सील असताना ग्रामपंचायत आधिकाऱ्यांची कार्यालयातच बियर पार्टी

साम टीव्ही
शुक्रवार, 29 मे 2020
  • गाव सील असताना आधिकाऱ्यांची बियर पार्टी
  • वैराग ग्रामपंचायत कार्यालयातला धक्कादायक प्रकार
  • गाव कोमात अन् प्रशासन जोमात

एकिकडे सारं जग कोरोनाशी लढण्यात मग्न असताना, सोलापूरच्या वैरागमध्ये मात्र संतापजनक प्रकार घडलाय. कोरोनामुळे गाव सील असताना ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी अधिकारी मात्र ओली पार्टी करण्यात मग्न होते.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने सोलापूर जिल्ह्यातलं वैराग हे गाव सध्या सील केलंय. त्यामुळे अख्खं गाव ठप्प पण ग्रामपंचायत कार्यालयात मात्र भलताच प्रकार सुरू होता. 

ग्रामपंचायत कार्यालयात चक्क दारुची पार्टी रंगली होती. बेधुंद झालेले अधिकारी अगदी आपल्या केबिनमध्येच कोरोनावरील गहन चर्चेत मग्न असतानाच ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत तिथं पोहोचले आणि रंगाचा बेरंग झाला.

ग्रामपंचायत सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती आणि शिव्यांची लाखोली एकाच वेळी सुरू केली आणि मग काय सुरू झाली अधिकाऱ्यांची पळापळ. कुणी गपचूप उठला तर कुणी गपगुमान कडेची वाट धरली..साहेबपण तोंडावर मास्क चढवून निघाले.

या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढतोय. एकीकडे जिल्हा आणि तालुका प्रशासन रात्रंदिवस राबतंय. पण वैरागच्या ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र जणू वैराग्य पत्करून कर्तव्याकडे दुर्लक्ष केलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live