गनिमी काव्यानं बेळगावात घुमला मराठी हुंकार! पाहा कसा फडकला भगवा

साम टीव्ही
शुक्रवार, 22 जानेवारी 2021
  • बेळगावमध्ये फडकला भगवा
  • बेळगावच्या कोनेवाडीत शिवसैनिकांचा गनिमी कावा
  • कन्नडिगांना शिवसेनेचा धोबीपछाड

बेळगावात पुन्हा मराठी हुंकार घुमलाय. कन्नडिगांच्या मुजोरीला जशास तसं उत्तर देत सीमाबांधवांनी बेळगावात पुन्हा भगवा फडकवलाय.

कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बेळगावमध्ये जाऊन भगवा ध्वज फडकवण्याची घोषणा केली आणि सीमाभागातलं वातावरण एकदम तणावग्रस्त बनलं..काही दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बळजबरीने संघटनेचा ध्वज बेळगाव महापालिकेसमोर लावला होता. कन्नडिगांच्या या कृतीचा निषेध करत कन्नडिगांचा ध्वज त्वरित काढावा या मागणीसाठी आज बेळगावात मोठा मोर्चा निघणार होता. मात्र कर्नाटक पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठिय्या दिला.

कोल्हापुरातून चंदगडमार्गे हे शिवसैनिक बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करत असतानाच बेळगाव पोलिसांनी त्यांना सीमेवर रोखलं. 

बेळगावच्या सर्वच सीमांवर पोलिसांनी नाकेबंदी केली होती. मात्र कानडी पोलिसांच्या हातावर तुरी देत शिवसैनिकांनी गनिमी कावा साधत बेळगावाच्या हद्दीत प्रवेश केला. आणि कोनेवाडीत अखेर भगवा फडकवला..शिवसैनिकांच्या या गनिमी काव्याने कन्नडिगांचा तीळपापड झालाय हे नक्की.


संबंधित बातम्या

Saam TV Live