या स्मार्टफोनमध्ये व्हायरस पसरवून कोट्यवधींची कमाई, चिनी कंपनीचा पर्दाफाश

साम टीव्ही
बुधवार, 9 डिसेंबर 2020
  •  
  • स्मार्टफोनमध्ये व्हायरस पसरवून कोट्यवधींची कमाई
  • चिनी कंपनीचा पर्दाफाश
  • अवैधरीत्या डिव्हाईसेस नियंत्रित केल्याप्रकरणी चार अधिकारी दोषी

स्मार्टफोनमध्ये व्हायरस पसरवून कोट्यवधींची कमाई केल्याचा चीनी कंपनीचा डाव उघड झालाय. विशेष म्हणजे चीनच्याच कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे या कंपनीचं खरं रूप समोर आलंय. 

चीनमधील एका कोर्टानं चीनी स्मार्टफोन निमार्ता कंपनी जिओनीशी संबंधित एक मोठा निर्णय दिलाय. या निकालानुसार, जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीनं जाणीवपूर्वक तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त डिव्हाईसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरस टाकल्याची माहिती आता समोर आलीय. युजर्सच्या परवानगी शिवाय त्यांना अनावश्यक जाहिराती या व्हायरसच्या माध्यमातून दाखवण्यात येतायेत. यामार्फत कंपनीनं कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत एका ऍपच्या माध्यमातून तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त जियोनी फोन्स हे जाणीवपूर्वक ट्रोजन हॉर्स मॅलवेअरनं संक्रमित करण्यात आलं. एका टूलच्या मदतीने हे ऍप बक्कळ कमाई करत होतं. हा व्हायरस ‘स्टोरी लॉक स्क्रीन’ ऍप या अपडेटमार्फत या फोनमध्ये टाकण्यात आला. जिओनीची सहाय्यक कंपनी शेन्झेन झिपू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडनं हे काम केलं होतं.

डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत कंपनीनं ट्रोजन हॉर्सद्वारे 42 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 31 कोटी रुपये कमावले आहेत. याच काळात कंपनीनं केवळ 13 डॉलर्स म्हणजे सुमारे 9.59 कोटी रुपये खर्च केले. अवैधरीत्या डिव्हाईसेस नियंत्रित केल्याप्रकरणी चार अधिकारी दोषी आढळले आहेत. प्रत्येकाला दोन लाख युआन म्हणजेच सुमारे 22 लाख रुपये दंड आणि तीन वर्षांची जेलची शिक्षा सुनावण्यात आलीय. हे प्रकरण उघडकीस आल्यानं चिनी कंपनीचा पर्दाफाश झालाय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live