शहा-मोदींना समजण्यासठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील : शेलार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

'सध्या तीन पक्षांचा जो ड्रामा सुरू आहे, तो महाराष्ट्राला आवडत नाहीये. रोज सकाळी जी पत्रकार परिषद होते, ते वगनाट्य वाटते. भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचा आदर म्हणून मातोश्रीवर जायचे, पण आता इतर पक्षातील लोकांना भेटायला मातोश्रीमधूनच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जावे लागते, असा टोला शेलारांनी यावेळी लगावला.

मुंबई : 'मोदी-शहांना समजून घेण्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील. राऊतांनी वयाप्रमाणे परिपक्वता वाढवावी. ठाकरे-मोदींमध्ये राऊतांमुळेच विसंवाद झाला आहे. शहांनी सत्यच सांगितले होते, मात्र राऊतांनी त्यांना खोटे ठरवले.' असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. यावेळी त्यांनी राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 

'आज पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होत आहे. 90 हजार बूथवर जाऊन भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम आता सर्व जिल्हाध्यक्ष व भाजप नेते करणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करायचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील करणार आहेत. ही बैठक झाली की भाजपचे कार्यकर्ते गावागावात जाऊन ओल्या दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करतीलस,' असे शेलार यांनी यावेळी सांगितले. 

 

'सध्या तीन पक्षांचा जो ड्रामा सुरू आहे, तो महाराष्ट्राला आवडत नाहीये. रोज सकाळी जी पत्रकार परिषद होते, ते वगनाट्य वाटते. भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचा आदर म्हणून मातोश्रीवर जायचे, पण आता इतर पक्षातील लोकांना भेटायला मातोश्रीमधूनच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जावे लागते, असा टोला शेलारांनी यावेळी लगावला.

संजय राऊत म्हणतात, 'बन्दे है हम उसके....'
संजय राऊत यांनी आज ट्विट करताना म्हणलं आहे की, 'बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर'. हे गाणे 'धूम 3' या चित्रपटातले असून आदित्य चोप्रांनी लिहिले आहे. या ट्विटवरून अजूनही त्यांना सत्तास्थापनेबाबत सकारात्मकता आहे, असे लक्षात येते. एका पत्रकार परिषदेत त्यांना या दररोजच्या ट्विटबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, हिंदीतील अनेक कवी माझ्या आवडीचे आहेत. त्यांच्या मला पटणाऱ्या काही ओळी मी दररोज ट्विट करतो. यातून कोणाला काही संदेश पोहोटविण्याचा हेतू नाही. त्यांनी असे स्पष्टीकरण दिले असले, तरी त्यांचे रोजचे ट्विट हे भाजपला टोला लगावणारे असते.

Web Title: BJP leader Ashish Shelar criticize Shivsena MP Sanjay Raut


संबंधित बातम्या

Saam TV Live