निकाल लागले.. आणि भाजपचे नेते शांत झाले..!

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे सहा महिने उरलेले असतानाच झडझडीत पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या भाजपच्या नेतृत्त्वाने आज (मंगळवार) पाच राज्यांमधील निवडणूक निकालावर भाष्य करणे टाळले. यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राजस्थान गमावलेल्या वसुंधराराजे या नेत्यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे सहा महिने उरलेले असतानाच झडझडीत पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या भाजपच्या नेतृत्त्वाने आज (मंगळवार) पाच राज्यांमधील निवडणूक निकालावर भाष्य करणे टाळले. यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राजस्थान गमावलेल्या वसुंधराराजे या नेत्यांचा समावेश आहे. 

पाचपैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्ये भाजपच्या ताब्यात होती. या तीनपैकी छत्तीसगडमध्ये भाजपला सपशेल पराभव स्वीकारावा लागला. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेसमध्ये सत्तेचे पारडे सतत दोन्ही बाजूंना झुकत आहे. दुपारी बारापर्यंतच्या कौलांनुसार, भाजप 102 जागांवर तर कॉंग्रेस 116 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजप 80, तर कॉंग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे. 

दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरवातीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी प्रथेप्रमाणे संसद अधिवेशनातील कामकाजाविषयी भाष्य केले. पण निवडणूक निकालाविषयी एक अवाक्षरही काढले नाही. अर्थात, 'विरोधकांनी चर्चा करावी. वाद असो वा विवाद, संवाद असायलाच हवा' असा थोडा नरमाईचा सूर लावल्याचे जाणवले. 

कॉंग्रेससह पक्षांतर्गत विरोधकांचाही सामना करावा लागलेल्या वसुंधराराजे यांनी 'नो कॉमेंट्‌स' अशा दोन शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. सकाळपासून वसुंधराराजे त्रिपुरा सुंदरी मंदिरामध्ये पूजा करत आहेत. अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत त्या मंदिरातच असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दुसरीकडे, दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही पत्रकारांनी निवडणुकीविषयी प्रश्‍न विचारले. त्यावेळी राजनाथसिंह यांनी तेलंगणातील निवडणुकीविषयी भाष्य केले. मात्र, छत्तीसगड-राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निकालांविषयी एक शब्दही उच्चारला नाही.

Web Title:BJP leaders refused to comment on assembly elections of Rajasthan, Chhattisgarh, Madhya Pradesh


संबंधित बातम्या

Saam TV Live