भाजप नेत्यांना म्हाडातून रामराम

सरकारनामा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020


म्हाडाच्या विविध मंडळांवर करण्यात आलेल्या राजकीय व्यक्तींच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजप सभापतींच्या नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत

 

मुंबई  : म्हाडाच्या विविध मंडळांवर करण्यात आलेल्या राजकीय व्यक्तींच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजप सभापतींच्या नियुक्‍त्या रद्द करण्यात आल्या असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत.

आघाडी सरकारने अनेक वर्षे म्हाडाच्या विविध मंडळांवर राजकीय नियुक्‍त्या केल्या नव्हत्या. युती सरकार 2014 मध्ये आल्यानंतर म्हाडाच्या विविध मंडळांवर नियुक्‍त्या झाल्या. म्हाडाचे अध्यक्षपद उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले. शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची विविध मंडळांवर सभापती म्हणून वर्णी लागली. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय घेत आहे. त्यानुसार म्हाडाच्या मंडळांवरील नियुक्‍त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद देण्यात आल्याने त्यांचे म्हाडा अध्यक्षपद रद्द करण्यात आले आहे. मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, नागपूर मंडळाचे तारिक कुरेशी, कोकण मंडळाचे बाळासाहेब पाटील, औरंगाबाद मंडळाचे संजय केणेकर, नाशिक मंडळाचे बबन चौधरी आणि पुणे मंडळाचे उपसभापती विक्रम पाटील या भाजप नेत्यांच्या नियुक्‍त्या रद्द करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे विजय नहाटा आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live