चंद्रकांत पाटील लढणार कोथरूडमधून

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

 

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी कमालीच्या नाराज झाल्या आहेत. 

 

मुंबई - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिल्याने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी कमालीच्या नाराज झाल्या आहेत. 

औपचारिक यादी पक्षाने घोषित न केल्याने नेमके काय झाले आहे, याची विचारणा करण्यासाठी आज मेधा कुलकर्णी यांनी समर्थकांसह मुंबई गाठली. मुलाप्रमाणे वाढवलेल्या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत एक  लाखाहून अधिक मताधिक्‍य गिरीश बापट यांना मिळवून दिले, त्यात माझ्या कामाचे योगदान होते तरी मला का डावलेले गेले, असा प्रश्‍न त्यांनी केला. आपल्या पाठीशी १९ ते २१ नगरसेवक असल्याचेही त्या सांगत होत्या. 

कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याची माहिती आल्यानंतर कुलकर्णी यांच्या समर्थकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. त्यानंतर त्या दुपारी थेट मुंबईला प्रदेश कार्यालयात पोचल्या. तेथे त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा अन्याय का, असा प्रश्‍न केला. त्या वेळी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करायचा असतो, असे पाटील यांनी त्यांना समजावले, असे सांगण्यात येते. 

चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी काम करू, असे मेधा कुलकर्णी यांनी सांगितल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रदेश कार्यालयासमोर उभ्या असलेल्या पत्रकारांशी काहीही न बोलता त्या निघून गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे सुकलेले अश्रू चर्चेचा विषय होता. चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, एखादा उमेदवार पाच वर्षे तयारी करतो. मात्र, काही कारणास्तव त्या कार्यकर्त्याच्या विरोधात निर्णय घेतला, तर तो माणूस म्हणून त्याची नाराजी समजू शकतो. मात्र, तो विरोधात जाईल, असे अजिबात नाही, असे ते म्हणाले. भाजप नेते रघुनाथ कुलकर्णी, प्रवक्‍ते विश्‍वास पाठक तसेच अन्य काही नेत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या उमेदवारीविरुद्ध नापसंती व्यक्‍त करण्याचा प्रकार भाजपत घडणे अनाकलनीय असल्याचे सांगितले जात होते. पक्षाचा निर्णय मान्य आहे, असे सांगणारे दूरध्वनी पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील यांना दिवसभर येत होते.

दरम्यान, पक्ष हा कोणाचा नसतो. संघटना जी जबाबदारी देते, ती पार पाडावी लागते. मला पक्षाने सांगितल्याने कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना सांगितले. तर, लोकसभेपेक्षा कोथरूड मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्‍याने दादा तुम्हाला निवडून आणू. माझ्या मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उभे राहत आहेत, हे मला सर्टिफिकेट दिले जातेय, असे मेधा कुलकर्णी यांनी म्हटल्याचे सांगण्यात आले.

स्मिता वाघ, सानप यांनाही हवी उमेदवारी
विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ विधानसभेत संधी मागण्यासाठी हजर झाल्या होत्या. नाशिक परिसरातील बाळासाहेब सानप यांची उमेदवारी धोक्‍यात आहे असे मानले जाते आहे. तेही आज प्रदेशाध्यक्षांना भेटायला आले होते. शिवसेनेने कागल मतदारसंघात संजय घाटगे यांना एबी फॉर्म दिल्याने भाजपचे समरजित घाडगे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

Web Title: BJP state president Chandrakant Patil gets nomination from Kothrudh Assembly constituency in Pune
 


संबंधित बातम्या

Saam TV Live