इथे पाताळात शिखर आहे...

रवि पत्की
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

दीपक चहार एक मस्त प्रोस्पेक्ट म्हणून पुढे आलाय.आत्ताच्या आयपीएल मध्ये त्याने नवीन भारतीय गोलनदाजांपैकी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे.बुमराह,शमी बरोबर भुवनेश्वरने स्वतःचे छान बस्तान बसवले असे वाटत असतानाच त्याला फिटनेस ने सतावले आहे. अशा परिस्थितीत तितक्याच अचूकतेने दोन्ही स्विंग करणारा चहारकडे आपण नक्कीच आशेने बघू शकतो.चहारच्या स्किलचे विलक्षण कौतुक वाटते. अवघड गोष्टी सहज शक्य करतोय तो.

टी20 क्रिकेट तसे नवेच आहे. जेमतेम 15 वर्षाच्या कुमार अवस्थेतलं. सुरुवातीला तर 20 ओव्हर्स चे नियोजन कसे करायचे हे ही संघांना शिकावे लागले. धुमधडाका फलनदाजी करणारे आणि पिच पेक्षा व्यायामशाळेत मातब्बर असणारे चेंडूला स्टँड मध्ये भिरकवणारे बायसेप्स फलनदाज हेच ह्या जॉनरचे हिरो असा होरा बनणे साहजिक होते. नंतर हळू हळू गोलनदाजांचे महत्व लक्षात येऊ लागले आणि आता तर उत्तम कर्णधार आणि वैविध्यपूर्ण गोलनदाजी असणारा संघ सर्वात उत्तम कामगिरी करणारा ठरतो असा निष्कर्ष निघू लागला. कारण त्यांची भूमिका निर्णयक सिद्ध होऊ लागली. सगळे जण  वैविध्याच्या मागे लागले. ऑफसपीनर कॅरम बॉलच्या मागे लागले तर लेगस्पिनर कळणार नाही अशा गुगली ऍक्शन च्या. फास्ट बॉलर्सनी स्लोवर वन चे प्रकार,बाऊन्सर चे प्रकार यावर काम केले. पण ह्या सगळ्या चेंडूंचा राजा ठरला यॉर्कर. फलनदाजाच्या पायाच्या अंगठ्याचा वेध घेणारा,ऑफस्टम्पच्या आणि मिडल स्टंप च्या तळाचा वेध घेणारा यॉर्कर. नेम धरून टाकलेला. यॉर्कर म्हणजे फलनदाजाच्या, पायाचा,स्टंप चा सर्वात तळ शोधणारा . म्हणजे एका अर्थाने पाताळ धुंड्याच. पण जो गोलनदाज ह्या पाताळाचा सतत अचूक वेध घेतो तो त्या संघाचा मुकुटमणी होतो आणि त्यावर मोठी बोली लावली जाते.थोडक्यात इथे यशाच्या,सुबत्तेच्या शिखराचा रस्ता पाताळातून जातो. ह्या यॉर्कर मध्ये सुद्धा वैविध्य आलं आहे.T20 मध्ये चेंडू जुना व्ह्यायला फार वाव नसल्याने रिव्हर्स स्विंग होणारे यॉर्कर्स फारसे दिसत नाहीत. मग ऑफ स्टंपच्या एक फूट बाहेर फुल लेंथ जीवखाऊन टाकलेला चेंडू यॉर्कर चा चुलत भाऊ म्हणता येईल. हा स्टंप मध्ये नसतो एव्हढी एक गोष्ट सोडली तर तो यॉर्करच म्हणता येईल. ह्या चेंडूने परवा शमीने सुपर ओव्हर मध्ये मुंबईला सहा धावा करू दिल्या नाहीत. बॉलरने चेंडू सोडायच्या आधीच फ्लनदाजाने हालचाल केली तर फलनदाज अडचणीत येतो. दिनेश कार्तिकने बांगलादेश विरुद्ध निधास ट्रॉफीत शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला तो हाच चेंडू होता.फक्त त्याने आधी कोणतीच हालचाल केली नाही म्हणून तो फटका त्याला आयत्यावेळेस मारता आला. आजकाल फलनदाज फाईनलेग वरून स्कूप शॉट मारायला आधीच सज्ज होतात आणि ह्या चेंडूवर फसू शकतात. 

जितके अचूक चेंडू टाकले तितकेच रोहित आणि डिकॉकने स्कूप शॉटची घाई केली.अन्यथा कव्हर आणि मिडऑफला धावा झाल्या असत्या.हा चेंडू आणि त्याचे  फलनदाज आणि गोलनदाजामधील बुद्धिबळ ही T20 मधली नवी मेजवानी आहे. शमीच्या यशात त्याच्या सुधारलेल्या फिटनेसचा वाटा सुद्धा आहे हे विसरता येणार नाही.पूर्वी तो गोलनदाजी करताना स्वतःच्या शरीराला टो करून  नेतोय असं वाटत असे.आता तो लयीत धावतो.बुमराहने तर यॉर्कर वर आपली पूर्वीच स्वाक्षरी केली आहे.

दीपक चहार एक मस्त प्रोस्पेक्ट म्हणून पुढे आलाय.आत्ताच्या आयपीएल मध्ये त्याने नवीन भारतीय गोलनदाजांपैकी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे.बुमराह,शमी बरोबर भुवनेश्वरने स्वतःचे छान बस्तान बसवले असे वाटत असतानाच त्याला फिटनेस ने सतावले आहे. अशा परिस्थितीत तितक्याच अचूकतेने दोन्ही स्विंग करणारा चहारकडे आपण नक्कीच आशेने बघू शकतो.चहारच्या स्किलचे विलक्षण कौतुक वाटते. अवघड गोष्टी सहज शक्य करतोय तो.

असो, यॉर्कर चे प्रकार   आणि त्या बरोबरचे बुद्धीबळ हे दोन्ही एन्जॉय करायला विसरू नका. क्रिकेट रोज नवनवीन प्रकारे स्तिमित करावयाचे थांबवत नाही. म्हणूनच त्या सम तोच खेळ.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live