Blog | क्यूँ न ऐ शख्स तुझे हाथ लगाकर देखूँ.......

रवि पत्की
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

क्यूँ न ऐ शख्स तुझे हाथ लगाकर देखूँ.......

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या T20 मालिकेत विराट कोहली ग्रेटनेसच्या शिखराच्या अजून एक पायरी जवळ पोहचला आहे. ह्या मालिकेत त्याने पूर्वी कधी न केलेले फलंदाजीतले काही नवीन प्रयोग केले. जेव्हा जास्तं ग्रेट कोण ही स्पर्धा ज्यांच्यात चाललेली असते असे दोन खेळाडू एका मालिकेत प्रतिस्पर्धी संघात खेळत असतात तेव्हा श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची ईर्षा दोघांच्या मनात चालू असते.दोघे एकमेकाला ऑब्ज़र्व करत असतात.एकमेकाच्या स्कोर ची,स्कोर केलेल्या सिच्युएशनची, इतरांपेक्षा वेगळेपणाची नोंद ठेवत असतात. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये कोहली आणि स्मिथ मध्ये असेच एक सुप्त वर्चस्व युद्ध चालू होते. (इंग्लंड विरुद्ध सिरीज असली की कोहली विरुद्ध जो रूट,न्यूझीलंड विरुद्ध सिरीजमध्ये कोहली विरुद्ध विलीअमसन अशा लढाया चालू असतात.)स्मिथ ने ODI मध्ये दोन शतकं केली तर कोहलीने दोन अर्धशतकं. T20 मध्ये कोहलीने जास्तं धावा केल्या. पण ह्या दोन्ही सिरीज संपल्यानंतर स्मिथ विरुद्ध कोहली ह्या द्वंद्वापेक्षा कोहलीच्या खेळात आलेल्या काही नवीन पैलूंनी लक्ष वेधून घेतले.चकित केले म्हणले तर जास्त योग्य होईल. डिव्हिलिअर्स ची मुद्रा असलेला स्कूप शॉट आणि रिचर्ड्स च्या जातकुळीचा स्क्वेअरलेग वरून झटका षटकार ने डोळे फिरले. एक T20 मॅच कव्हर करायला वानखेडेला गेलो होतो. मॅचच्या आधल्या दिवशी सराव होता. नेट्समध्ये कोहली बॅटिंग करत असताना गोलंदाजाने चेंडू टाकला की का$$$ड असा बॅट मधून आवाज येत होता आणि दुसरा धा$$ड असा आवाज चेंडू स्टेडियम मधल्या खुर्च्यांवर आदळल्याचा. इतके म्हणजे इतके सहज षटकार मारतो तो. 100 चेंडू खेळले तर त्यातले 70 तर आरामात खुर्च्यांवर जाऊन पडतात.
फलंदाज फलंदाजी करताना दोन चेंडूंच्या मध्ये तो काय करतो,त्याची देहबोली काय असते हे नीट पाहिले तर फलनदाजाचा पोत समजतो.कोहलीने चौकार किंवा षटकार मारला की पुन्हा पुढचा चेंडू मी कधी फेस करतो ह्याची घाई त्याला झालेली असते. त्याच्या डोक्यात आडाखे चालू असतात,प्लॅन चालू असतात,पुढचा चेंडू कुठे बदडायचा हे तो ठरवत असतो.त्याला बॉलरचा खात्मा करायची घाई झालेली असते. त्याला अशक्य असे काही वाटतच नाही. त्याच्या शॉट्स च्या रेंजने,सातत्याने,सामने जिंकून द्यायच्या क्षमतेने ,चेस करण्याच्या नैपुण्याने आपण आधीच घायाळ होतो.त्याच्या  पराक्रमी खेळयांवर विश्वास ठेवणे अवघड असते. आता त्याने त्याच्या भात्त्यात आणलेली नवीन अस्त्रे बघून अब्बास ताबिश साहेबांचा शेर आठवला.

क्यूँ न ऐ शख्स तुझे हाथ लगाकर देखूँ
तू मेरे वहम से बढकर भी तो हो सकता है

 

अमेरिका

 


संबंधित बातम्या

Saam TV Live