''अडकू नका चालीसा अन् भोंग्यात, नेत्यांचं कोणी मरत नाही पेटवलेल्या दंग्यात''

कोरोना महामारीनंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी अनेकांना नवीन रोजगाराची आवश्यकता आहे.
''अडकू नका चालीसा अन् भोंग्यात, नेत्यांचं कोणी मरत नाही पेटवलेल्या दंग्यात''
loudspeakerSaam TV

डॉ. राजकुमार देशमुख

आपण भाग्यवान आहोत की आपल्या भारत देशाला थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. अशिक्षित समाजाला शिक्षित करून देशामध्ये असलेल्या जाती धर्मांमधील भिंती नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य खर्चिले. समाज शिक्षित झाला खरा, पण तो सुजाण नाही झाला, म्हणूनच की काय आज समोर असणाऱ्या असंख्य प्रश्नांकडे त्याचे दुर्लक्ष होताना आणि जाती धर्मातील तेढ वाढताना दिसत आहे?

कोरोना महामारीनंतर विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी अनेकांना नवीन रोजगाराची आवश्यकता आहे. बेरोजगारीचे अनेक उच्चांक देश गाठत असताना कोणती चालीसा आणि भोंगा आपले पोट भरायला येणार आहे? प्रत्येक दिवसाला महागाई वाढत चालली आहे. गॅस, पेट्रोल डिझेलचे दर यांच्यात तर दर वाढण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. राजकीय पक्ष त्यांच्या अस्तित्वासाठी अनेक विषय तुमच्या समोर मांडतील पण आपले स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला महत्वाचे आहे ते शिक्षण, नोकरी आणि व्यवसायच !

अनेक भाषा, जाती आणि धर्म अशा विविधतेने नटलेला आपला देश; आपली विविधता हीच आपली ताकत असताना या विविधतेमधल्या एकतेला कोणी तोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर या देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपण आवाज उठवला पाहिजे. राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचा धार्मिक अजेंडा आपल्यावर थोपवायचा प्रयत्न करतील पण तो उलथवून लावण्याची धमक युवकांनी दाखविणे ही खरी राष्ट्रभक्ती आहे. प्रत्येकाला जात आणि धर्म असला तरी सर्वप्रथम आपण भारतीय आहोत. अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी आपली न्यायव्यवस्था सुदृढ आहे.

आजच्या घडीला खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे महागाई, वीजकपात, शिक्षण व बेरोजगारी यासारखे अनेक महत्वाचे प्रश्न प्रसारमाध्यमांनी देखील दाखविले पाहिजेत. जनतेच्या मनातील प्रश्नांचा ठाव घेता येईल अशा लोकप्रतिनिधींची आणि समाजमाध्यमांची खऱ्या अर्थाने आज उणीव भासताना दिसत आहे. एक कर्तव्य म्हणून आपण सामाजिक शांतता बिघडवू पाहणाऱ्या कोणत्याही विचारला थारा देता कामा नये. इतिहासात डोकावून पाहिले की जाती धर्मांच्या नावाने भडकवलेल्या दंग्यात मरतात ती सामान्य माणसे, ना की नेत्यांचे कोणी. त्यामुळे सामाजिक सलोखा, शांतता राखणे ही आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडू !!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com