Crime Podcast: पूजा विधीचं नाटक करुन सावज टिपायची; 11 महिलांची हत्या करणारी 'सायनाईड मल्लिका'

Cynide Mallika A women muderer in Karnataka: सर्व महिला मंदिरांच्या परिसरात मृतावस्थेत आढळल्यानं या संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढलं होतं.
crime podcast
crime podcastsaam tv

Crime Unplugged | Marathi Crime Podcast: कर्नाटक पोलिसांच्या दृष्टीनं १९९९ ते २००७ हा काळ अत्यंत कसोटीचा ठरला होता. या काळात तब्बत ११ महिला साईनाईड या अत्यंत घातक विषाच्या प्रभावानं मरण पावल्याचं आढळलं होतं. या सर्व महिला मंदिरांच्या परिसरात मृतावस्थेत आढळल्यानं या संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढलं होतं. या साऱ्या प्रकरणांचे गुढ उलगडले ते ३१ डिसेंबर, २००८ ला. कर्नाटकातल्या एका बसस्टँडवर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं. ही महिला चोरीचे दागिने विकायला आल्याची खबर पोलिसांना लागली होती. तिच्या ताब्यात दागिने सापडलेही. आणि त्यानंतरच्या तपासात तिने दिली ती आपण केलेल्या खुनांची कबुली.

तिचं नांव के. डी. केंपाम्मा. तिचे गुन्हे उघड झाल्यानंतर तिला टोपण नांव पडलं 'सायनाईड मल्लिका'. तिच्या गुन्ह्यांकडे वळण्यापूर्वी तिचा पूर्व इतिहास जाणून घ्यायला हवा. कर्नाटकची राजधानी बंगळुरूजवळ असललेल्या कंगाल्लीपुरा भागात ती रहायची. शिवणकाम करणाऱ्या एकाशी तिचं लग्न झालं होतं. त्यावेळी केंपाम्मा 'चीट फंड' चालवायची. त्यात भरपूर तो,टा झाला आणि तिच्या नवऱ्यानं तिला हाकलून दिलं. तिला तीन मुलं होती. घरातून बाहेर काढल्यानंतर केंपम्मानं छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. तिने काही ठिकाणी घरकामाची नोकरीही केली. एका सराफाच्या पेढीवरही ती कामाला होती. ज्या घरांत ती कामाला होती, तिथं ती छोट्या छोट्या चोऱ्या करायची. (Crime News)

त्यानंतर तिच्या डोक्यात भयानक कल्पना आली आणि परिणामी अकरा महिलांना आपले प्राण गमवावे लागले. चोऱ्यांना सरावलेल्या केंपाम्मानं आपली सावजं हेरायला सुरुवात केली. आसपासच्या परिसरातल्या मंदिरांमध्ये आपल्या समस्या देवापुढं मांडायला महिला येतात हे तिनं पाहिलं आणि तिला आपलं सावज सापडलं. केंपम्मान मग आपल्याला दैवी शक्ती असल्याचं भासवायला सुरुवात केली. मंदिरात आलेलं सावज जाळ्यात सापडू शकतं अशी खात्री पडली की ती त्या महिलेला गाठायची. तिची समस्या ऐकून घ्यायची आणि मग ही समस्या सोडवण्यासाठी काही विधी करायला लागतील, असं सांगून ती त्या महिलेला पटवायची.

कुणाला मूल हवं असायचं तर कुणाला घरात जाच असायचा. अशा समस्यांनी पिचलेल्या महिला केंपम्माच्या आमिषाला भुलायच्या आणि ती सांगते ते विधी करायला तयार व्हायच्या. मग ती एक दिवस ठरवून शहराच्या बाहेर असलेल्या मंदिरात आपले कथित पूजा विधी करण्याची तयारी करायची. ही पूजा नावालाच प्रत्यक्षात पुढं काहीतरी भयानक घडायचं. काय घडायचं हे घेऊयात जाणून. (Saam TV Podcast)

crime podcast
Haryana Crime News : पाऊस आल्याने दुकानाबाहेर उभी राहिली, विद्यार्थिनीवर सलूनचालकाची नजर पडली, अन्...

या विधीसाठी संबंधित महिलेला नटून थटून यायला सांगितलं जायचं. साहजिकच या बिचाऱ्या महिला दागदागिन्यांनी सजून आपली समस्या सोडवण्यासाठी केंपम्मासमोर यायच्या. मग केंपम्मा या निर्जन मंदिरांमध्ये आपले पूजाविधी सुरु करायची. थातूर-मातूर विधी करुन झाले की मग ती आपल्या सावजाला डोळे मिटायला सांगायची आणि मग सावजाचे तोंड उघडून सायनाईड असलेला खाद्यपदार्थ ती त्या महिलेच्या तोंडात सारायची. सायनाईडचा परिणाम लगेचच होते. मग जीव वाचवण्यासाठी तडफडणाऱ्या या बिचाऱ्या महिलेचं नांक केंपम्मा बंद करायची आणि जीव जाईपर्यंत त्या महिलेला जमिनीवर दाबून ठेवायची.

एकदा जीव गेला की त्या मृत महिलेच्या अंगावरचे दागदागिने काढून घेऊन केंपम्मा पसार व्हायची. असे एकूण अकरा खून केंपम्माने केले. हळूहळू चर्चा व्हायला लागली. २००६ मध्ये अशाच एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा आणि केंपम्माचा परिचय होता हे या मृत महिलेच्या बहिणीला माहित होते. तिनंच पहिल्यांदा केंपम्मावर संशय व्यक्त केला. हळूहळू बाकी महिलांचे नातेवाईकही पुढे येऊन केंपम्मावर संशय व्यक्त करायला लागले. यापैकी काही महिलांचा आणि केंपम्माचा परिचय होता, हे हळुहळू तपासात पुढे यायला लागलं. केंपम्मा भोवतीचा फास आवळत चालला होता. अखेर केंपम्मा पोलिसांच्या जाळ्यात सापडलीच.

crime podcast
Crime Podcast: महाराष्ट्राला हादरवणारं परभणीचं 'मानवत हत्याकांड'; मांत्रिकाचा एक सल्ला अन् 11 निष्पाप जीवांचा क्रूर अंत

आपला प्रत्येक गुन्हा केल्यानंतर केंपम्मा नाव बदलून वावरायची. त्यावेळी पकडली गेली तेव्हाही तिनं पोलिसांना आपलं खोटं नावच सांगितलं होतं. पण तपासात सत्य बाहेर पडलंच. केंपम्मा विरुद्धचे प्रत्येक गुन्ह्याचे खटले स्वतंत्रपणे चालले. अकरापैकी सहा गुन्ह्यांमध्ये पोलिस केंपम्माचा संबंध जोडू शकले. या सहापैकी पाच गुन्ह्यांमध्ये केंपम्माला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. पण कर्नाटक उच्च न्यायालयाने तिची शिक्षा जन्मठेपेत बदलली.

२०१७ मध्ये केंपम्मा पुन्हा एकदा चर्चेत आली ती वेगळ्याच कारणासाठी. तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता यांची सहाय्यक आणि अम्मा मुन्नेत्र कळघमच्या अध्यक्षा व्ही. के. शशिकला यांच्याशी तुरुंगात जमलेल्या तिच्या गट्टीमुळं. शशिकला यांना जयललिता यांच्या विरुद्धच्या बेकायदा मालमत्तेप्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आणि त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. त्यांना बंगळुरुच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. केंपम्मा त्यांच्या शेजारच्याच कोठडीत होती. तिनं शशिकला यांच्याशी मैत्री वाढवली. ती रोज शशिकला यांच्यासाठी जेवण घेऊन जायला लागली. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना यात धोका जाणवला आणि त्यांनी तातडीनं केंपम्माला बेळगाव जवळच्या हिंडल्गा तुरुंगात हलवलं.

crime podcast
Crime Podcast: फॅमिली डॉक्टर बनला 'देवमाणूस'; राज्य हादरवणारा, मुख्यमंत्री ते राष्ट्रपतींपर्यत पोहचलेला खून खटला

ही आहे कहाणी 'सायनाईड मल्लिका'ची. तिनं असं का केलं, हे मोठं गुढच आहे. पोलिसांच्या मते तिनं केवळ पैशांसाठी हे सगळे गुन्हे केले. पण गुन्हेगारी विषयाचे अभ्यासक हे मानायला तयार नाहीत. तिच्या खुनी मानसिकतेचं मूळ शोधण्यासाठी तिच्या पूर्वायुष्यात आणखी डोकवायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. (Latest Breaking News)

एक गोष्ट मात्र नक्की. या केंपम्माला २००१ मध्ये पकण्यात आलं होतं. एका घरातून दागिने चोरताना तिला पकडण्यात आलं. तिथंही ती काही पूजा विधी करायला गेली होती. तिथंही तिनं हाच प्रकार केला होता. मात्र, तिचं सावज असलेल्या महिलेनं स्वतःची सुटका करुन घेत आरडाओरडा केला आणि त्यामुळे ती वाचली. त्यावेळी केंपम्माला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यातून सुटल्यावर तिनं पुढचे गुन्हे केले. जर त्याचवेळी केंपम्माकडं सखोल तपास झाला असता तर? पण तसं व्हायचं नव्हतं. तिच्या हातून पुढचे खून जणू नियतीनेच लिहिले होते!

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com