मेलबर्न कसोटी पहिला दिवस भारताचा

मेलबर्न कसोटी पहिला दिवस भारताचा
मेलबर्न कसोटी पहिला दिवस भारताचा

आपल्याकडे चहाला वेळ नसते असे म्हणले जाते. तो कधीही चालतो. पण जेवणाला वेळ असते. थोडी इकडे तिकडे झाली तरी जेवणाला वेळ असतेच. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे समालोचक 'इट्स टाइम फॉर लंच' असे आपल्याइकडच्या पहाटे साडे सहाला म्हणतात तेव्हा काहीतरी वेगळंच फीलिंग येतं. पहाटे साडेसहाला समोर भाजी,पोळी,चटणी,कोशिंबिरीचं ताट आलं आहे असं डोळ्या समोर येतं आणि अन्नावरची वासना उडू शकते. तसेच त्यांच्या दुपारच्या चहाच्या वेळेस आपल्याकडे नाश्त्याचे पोहे फोडणीला स्वाहा झालेले असतात आणि सगळे खेळाडू दिवसभराच्या कामावरून घरी जातात तेव्हा आपण ऑफिसला जायची तयारी करत असतो. ऍडिलेडला डे नाईट टेस्ट होती त्यामुळे वेळेने परिक्षा घेतली नाही. पण मेलबर्नला पहाटे 4.30 ला गजर लावून टिव्ही समोर बसणाऱ्या तमाम भारतीय क्रिकेट शौकिनांची पॅशन लेवल नेक्स्ट लेवलची असते.


मी ह्या सामन्याकडे ज्या कारणामुळे खूप कुतूहलाने बघतोय ते म्हणजे रहाणेचे नेतृत्व भारतीय क्रिकेटला काही नवीन विचार, डावपेच देतंय का ह्या दृष्टीने. बरेचदा काही टवटवीत आयडिया संघाला तोच तो पणाने आलेल्या कंटाळायातून बाहेर काढतात आणि संघाला एक तजेला येतो. रहाणे आज वेगवेगळे प्रयोग करतोय हे दिसले. अपारंपारिक फिल्ड पोजीशन्स बघून रहाणे प्रोऍक्टिव्ह नेतृत्व करतोय हे लक्षात आले. लिव्हरपूल फुटबॉल क्लबचा कोच क्लॉप ने जिगनप्रेसिंग हे तत्वज्ञान फुटबॉल मध्ये अधिक प्रचलित केले.ज्यात प्रतिस्पर्ध्याकडे चेंडू गेला तर थांबून न रहाता आक्रमकपणे अंगावर जाऊन बॉलचा ताबा मिळवायचाच. तसे पार्टनर्शीप थोडी होतीये असं वाटलं की गोलंदाजीत बदल करायचे. बॅट्समन ला स्थिरावू द्यायचे नाही हा महत्त्वाचा बदल रहाणेमुळे पहायला मिळाला. त्याने खेळ ड्रीफ्ट होऊ दिला नाही. दौऱ्यावर निवड करण्यासाठी अश्विनशी कोहली आणि शास्त्रीने बोलणी केली असावी असे वाटते. मागच्या दौऱ्यात तो निष्प्रभ होता. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर बाऊन्सचा आणि थोड्या वेगळ्या लाईनचा तू काय विचार केला आहेस हे त्याला विचारले गेले असावे. त्याच्या कडून समाधानकारक प्लॅनची खात्री झाल्यावर त्याला घेतलं असावं असं वाटतं. कारण तो मागच्या दौर्यापेक्षा वेगळा वाटतोय. सिराज च्या ऍक्शन वरूनच तो फुल लेंथ बॉलिंग जास्तं करत असेल असे वाटते. त्याने सर्वाधिक फुल लेंथ चेंडू टाकले. खेळपट्टीवरील गवत आणि छाती पर्यंत येणारा चेंडू बघता ऑस्ट्रेलियाचा 190 स्कोर वाईट नाही. आपल्याला कष्ट करावे लागणार.


गिल आणि जडेजामुळे संघाला खोली आल्याचे वाटते. शॉ तडाखेबंद आहे, पण चर्चिल म्हणायचा तसं I am ready to learn but not ready to be taught अशा पौगंडावस्थेतल्या विचारांनी ग्रस्त असेल तर त्याच्यावर व्यवस्थापनाला काम करावे लागेल. अन्यथा आत्तापर्यंत शॉ कडून ऑस्ट्रेलियन समालोचकांना सहजपणे उच्चारता येईल असे एक भारतीय आडनाव देण्या पलीकडे फार क्रिकेटसेवा घडलेली नाही. दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा कस लागेल.गिलने काही कडक शॉट्स दाखवले तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ऍडिलेंडची झलक काही चेंडूत दाखवली.
 

लहानपणी मित्राचे नवीन पार्कर पेन पाहून पालकांना असे पेन मला हवे आहे असे विचारल्यावर' आहे त्या पेनाने चांगले पेपर लिहून दाखवा' असे ब्रँडेड उत्तर मिळायचे. मेलबर्न च्या ग्राऊंडवर वोडाफोनचे लोक 5G ची जाहिरात करत होते तेव्हा पालकांचा तो संवाद आठवला. 
हॅलो,हॅलो.....आईला पुन्हा ड्रॉप(कॉल हो कॅच नाही).उद्या भेटूच.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com