टेस्ट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना हेच ध्येय...

टेस्ट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना हेच ध्येय...

ऑस्ट्रेलिया देशाची पृथ्वीवर निर्मिती केल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानायला हवेत असे अभिनेता रसेल क्रोव म्हणाला होता. त्यात चुक काहीच नाही. फक्तं त्यात ब्रॅडमन, चॅपल, मॅलेट,ग्रीमेट खेळलेल्या  ऍडिलेडची निर्मिती केल्याबद्दल देवाचे पुरवणी आभार मानायला तो विसरला. स्वास्थ्य आणि मनोरंजन ह्या आरोग्यदायी देणग्यांसाठी हे गाव ओळखलं जातं. तिथे सुरू होणारा पहिला कसोटी सामना फक्तं रंगापुरता गुलाबी असेल. त्यात प्रेमाची देवाणघेवाण असण्याची शक्यता नाही.

भारताला मालिकेपुरता विचार करायचा नाहीये. न्यूझीलंड कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा प्रबळ स्पर्धक बनून पुढे आला आहे.भारताच्या उरलेल्या आठ कसोटीत(4 ऑस्ट्रेलिया,4 इंग्लंड) 5 विजय मिळाले तर सरासरीत भारत न्यूझीलंडच्या पुढे राहील.(इथे आपण पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड,न्यूझीलंड मध्ये होणारे दोन्ही कसोटी जिंकेल असं धरून चाललोय).4 विजय,4 पराजय नाही चालणार.4 विजय,2 पराजय दोन ड्रॉ सुद्धा नाही चालणार. इंग्लंडशी भारतात होणारे चारही सामने भारत जिंकेल असं आधीच घोषित करायला इंग्लंडचा संघ म्हणजे झिम्बाब्वे नाही.त्यामुळे ऑस्ट्रेलियात काही कसोटी जिंकाव्या लागतील.

पिंक बॉल कसोटीने सुरुवात म्हणजे फारशी न तुडवलेली पायवाट आहे.मागच्या दौऱ्यात आपण पिंक बॉल कसोटीला नकार दिला होता. ICC मध्ये भारत मनमानी करतो असा नेहमीच आरोप होतो. DRS करता सुद्धा भारत खूप उशिरा तयार झाला म्हणून भारताविरुद्ध वातावरण तयार झाले होते. फार ताणायला नको म्हणून भारत तयार झाला आहे.

ऑस्ट्रेलिया  पिंक बॉल क्रिकेट मध्ये सरावला आहे.पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक विजय ऑस्ट्रेलिया च्या नावावर आहेत.जिथे ईतर खेळाडूंना पिंक चेंडूंचा स्विंग झेपत नाही तिथे वॉर्नर ने एका इनिंग मध्ये 335 केला आहे.स्टार्क 35 च्या strike rate ने पिंक चेंडूवर विकेट्स घेतो. त्यामुळे आपल्या सलामीच्या मयांक आणि शॉ ने आक्रमक सुरुवात करून देणे आणि पुढच्या फ्लनदाजानी जिद्दीने स्कोर 400 पर्यंत नेणे आवश्यक आहे.उमेश यादवने लेग स्टंप कडे जाणारे चेंडू टाकणे बंद केले तर बुमराह आणि शमीचा दबाव कायम राहील. स्मिथच्या दुखापतीचा परिणाम कितपत होतो ते पहायला लागेल. धावा नाही मिळाल्या तरी टीच्चून उभे राहणे आणि विकेट नाही मिळाली तरी टीच्चून टाकत रहाणे आवश्यक. पिंक सामने सामान्यत: पाचव्या दिवशी पर्यंत जात नाहीत. कोहलीच्या विजिगिशु वृत्तीने भारत  चांगली कामगिरी करू शकतो. मालिका सुरू होताना ऑस्ट्रेलियाला बर्याच गोष्टी श्रेयस्कर दिसत असल्या तरी भारताचा संघ कुठेही जिंकू शकतो.पहिल्या दोन वन डे हरल्यावर भारतीय संघाचे बर्याच लोकांनी श्राद्ध घातले होते.असे असताना भारतीय संघाने पुढची वन डे आणि दोन T20 सलग जिंकल्या. आपला संघ उत्तम बॉलर्स आणि बॅट्समन चे मिश्रण आहे.आता आवश्यक आहे सगळ्यांनी मिळून क्लीक होण्याचे. सामन्याचा थरार Sony six वर गुरुवार सकाळी 9.30पासून आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com