MPSC : हा तर निवडप्रक्रियेतील त्रुटींचा बळी !

अमर मोहितेच्या आत्महत्येनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचा संताप अनावर !
MPSC : हा तर निवडप्रक्रियेतील त्रुटींचा बळी !
अमर मोहिते | Amar Mohite SaamTv

- राजकुमार देशमुख

एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना एखाद्या पदासाठी जाहिरात येते, त्यामध्ये एकूण पदसंख्या, आरक्षणानुसार जागांची वर्गवारी दिलेली असते. आपल्या प्रवर्गासाठी किती जागा राखीव आहेत त्यानुसार परीक्षा देण्याबाबत विद्यार्थी निर्णय घेतात आणि मग परीक्षेसाठी अर्ज करतात. अभ्यासाचं नियोजन केलं जातं त्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा त्यानंतर शाररिक चाचणी आणि मुलाखत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः दिड ते दोन वर्षांचा संभाव्य कालावधी गृहीत धरला जातो. त्याप्रमाणे घरच्यांशी सवांद साधून दोन वर्षांच्या राहण्याचे, खाण्यापिण्याचे आणि पुस्तकांसाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन केले जाते.

आपला मुलगा अभ्यास करून अधिकारी होणार म्हणून घरचेही काबाडकष्ट करून, पोटाला चिमटा काढून दर महिन्याला पैसे पाठवतात. लाखो विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतून पूर्व परीक्षा पास होणे म्हणजे अर्धी लढाई जिंकलेली असते. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागावे लागते कारण इथं उत्तीर्ण झालो तर अंतिम निवड यादीत नाव येणार हे पक्के असते. मुख्य परीक्षेच्या निकालाची वाट पाहत असताना आपण केलेला अभ्यास, घेतलेले कष्ट डोळ्यासमोरून जात असतात. तेवढ्यात निकाल लागला आहे आणि आपले नाव निकालात आले आहे हे समजताच भला मोठा डोंगर सर केल्याची भावना आणि आनंदाश्रू एकत्रच येतात. त्यानंतर असते ती मुलाखत ! हत्ती गेला आणि शेपूट राहिला या भावनेतून मुलाखतीसाठी दमदार तयारी करून मोठ्या हिमतीने स्वतःला सिद्ध केले जाते.

त्यानंतर प्रतीक्षा असते ती अंतिम निकालाची ! पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर प्रतीक्षा असते ती निवड यादीत नाव येण्याची ! तब्बल दिड ते दोन वर्षांच्या कष्टाचे फळ या निकालावर अवलंबून असते. निकाल लागतो, अंतिम निवड यादीत नाव आलेल्या उमेदवारांची थेट शिफारस नियुक्त्यांसाठी केली जाते. अंतिम निवड यादीत आलेले नाव पाहून आनंद गगनात मावेनासा होतो. घरच्यांना पहिला फोन होतो, आई बाबा मी अधिकारी झालो ! होय मी एमपीएससी परीक्षा पास झालो. घरचे, मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे फोन खणानू लागतात. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू होतो. ध्येय साध्य झालेले असते. हा असतो एकंदरीत एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठीचा प्रवास.

तेवढ्यात काही दिवसानंतर एक बातमी येते की तुमची ज्या प्रवर्गातून, ज्या आरक्षणातून निवड झाली आहे ते आरक्षण आता रद्द झाले आहे. लागलेला निकाल रद्द होणार आहे आणि पुन्हा नव्याने निकाल जाहीर होणार आहे. नव्याने जाहीर झालेल्या निकालाची निवड यादी पाहिले असता आपले नाव त्यातून गायब झालेले असते. काय मनस्थिती होत असेल, किती विचारांचं वादळ मनात सुरू होत असेल ? हे काय झालं.... आता काय करायचं हे सर्व विचार आमच्या अमर मोहितेच्या मनात आले नसतील का ? परीक्षेत अपयश येणं ही वेगळी गोष्ट आहे परंतु निवड झाल्यानंतर तुमचं नाव निवड यादीतून वगळलं जाणं हे कसं पचवायचं ?

ज्या आरक्षणाच्या नियमानुसार मी परीक्षेला अर्ज केला होता, पूर्व परीक्षेसापासून ते मुलाखतीपर्यंत मी त्याच आरक्षणामूळे उत्तीर्ण झालो होतो तेच आरक्षण आज तुम्ही रद्द करता ! आरक्षण कशामुळे रद्द झाले याला जबाबदार कोण या विचारापेक्षा निवड यादीत आता आपले नाव नाही ही गोष्ट अमरला विसरता आली असेल का ? ज्या आरक्षणाच्या नियमानुसार परीक्षा झाल्या तो नियम शेवटपर्यंत का कायम राहत नाही ? जेंव्हा आरक्षण रद्द झाले त्या तारखेपासूनच्या पुढच्या परीक्षा तुम्ही नव्या नियमानुसार जरूर घ्या पण आमची झालेली निवड तुम्ही का रद्द करता ? हीच गोष्ट अमरला आज आपल्यातून घेऊन गेली. याला कोण दोषी, आत्महत्या हा मार्ग आहे का यावर चार दिवस चर्चा होतील पण व्यवस्थेतील ज्या त्रुटींमुळे अमरने आत्महत्या केली त्या त्रुटी सुधारण्यासाठी पावले उचलली जातील का ? स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येपासून या 'का' चे उत्तर आजतागायत मिळालेले नाही. व्यवस्थेला आरसा दाखविण्यासाठी आज 'अमर' व्हावे लागत आहे !

निशब्द !!

भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !

***

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com